भंडारा : जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या १४८ ग्रामपंचायतीपैकी ७४ ग्रामपंचायतीत शुक्रवार सरपंच, उपसरपंचांची निवड पार पडली. सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे असल्याचा दावा भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे.
शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली. तर उर्वरित ७४ ग्रामपंचायतीची निवड १५ फेब्रुवारी राेजी हाेणार आहे. शुक्रवारी सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झालेले सर्वाधिक आमच्याच गटाचे असल्याचा दावा राजकीय पक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे म्हणाले, राष्ट्रवादीच्या विचारसरणीचे सर्वाधिक सरपंच शुक्रवारी विराजमान झाले आहेत. १५ फेब्रुवारीनंतर स्थिती लक्षात येईल. त्यानंतर किती सरपंच राष्ट्रवादीचे झाले हे सांगितले जाईल.
काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई यांनी ७४ पैकी ४५ ग्रामपंचायतीत काॅंग्रेसचे सरपंच झाल्याचा दावा केला आहे. लाखांदूर साकाेली, लाखनी आणि पवनी तालुक्यात काॅंग्रेसने वर्चस्व स्थापन केल्याचे सांगितले. भाजपचे महामंत्री मुकेश थानथराटे म्हणाले, भंडारा तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायती आणि जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा राेवल्याचा दावा केला. गावागावात उत्साह दिसत हाेता.