लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्त्रीभृणहत्येविरुद्ध जनमानसात जागृती येत असण्याच्या काळातही, मुलगी जन्माला येणे हे नकोसे वाटत असल्याचे वास्तव भंडारा जिल्ह्यात समोर आले आहे. जुळ्या मुलीच झाल्याने एका निर्दयी मातेने आपल्या २६ दिवसाच्या चिमुकलीला टाक्यात बुडवून ठार मारल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या गौतम वॉर्डात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिवारातील काही सदस्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अल्फीया निश्चय रामटेके (२२) रा.गौतम वॉर्ड असे मातेचे नाव आहे. २६ दिवसांपूर्वी अल्फीयाला जुळ्या मुली झाल्या. अल्फीयाला मुलगा हवा होता. मात्र मुली झाल्याने ती बाळंतपणापासूनच संताप व्यक्त करीत होती. अशातच सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अल्फीया शौचास बाहेर गेली. परत आली तेव्हा खाटेवर एकच मुलगी होती. दुसऱ्या मुलीला कुणी उचलून नेले असे दर्शवून शोधाशोध सुरु केली. स्नानगृहाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीत २६ दिवसाच्या चिमुकलीचे शव आढळून आले. कामासाठी बाहेर गेलेले चिमुकलीचे आजोबा निमाज रामटेके व मोठे वडील अक्षय निमाज रामटेके घरी परतले. पाण्याच्या टाक्यात चिमुकलीचा मृतदेह पाहून अक्षय रामटेके यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी थेट पवनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयावरून अल्फीया रामटेके हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे तपास करीत आहेत. तुर्तास आरोपी अल्फीया रामटेके हिला अटक झाली नव्हती. मात्र परिवारातील काही सदस्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.