मोहन भोयर
तुमसर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणात वाढ झाली गाव शिवारात रुग्णांची संख्या वाढली. काही रुग्णांचा त्यात मृत्यू झाला. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना कायम हद्दपार व्हावा याकरिता देव्हाडी येथील महिलांनी ग्रामदेवता मातामायकडे साकडे घातले. देवीच्या मंदिरात सात दिवसांकरिता देवीपुढे ज्योती घट मांडण्यात आले आहे. ज्योती कलशासाठी लागणाऱ्या तेलाकरिता ग्रामस्थ पुढे आले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आस्थेपुढे नतमस्तक होऊन मानवी कल्याणाकरिता महिलांची येथे धडपड सुरू आहे.
देव्हाडी येथील तिलक नगरातील तलावाशेजारी ग्रामदेवता मातामायचे मंदिर आहे. या मातामायला संकटप्रसंगी आराधना केल्यास संकट दूर झाल्याची आख्यायिका आहे. एक वर्षापासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत देव्हाडी व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, अनेक जण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले. काहींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गावातील तरुणांचा मृत्यूमध्ये समावेश आहे. कोरोनाला हद्दपार करण्याकरिता मातामायकडे साकडे घालण्याचा निर्णय घेतला. याकरिता मातामाय मंदिरात सात ज्योती कलश ठेवण्यात आले. सात दिवसपर्यंत २४ तास ज्योती कलशांची ज्योती तेवत ठेवली आहे.
महिलांची मंदिरात देखरेख असून दररोज सकाळ संध्याकाळी मातामाय मंदिरात पूजा-अर्चना केली जाते. कोरोना नियमांची देखील पूर्णत: काळजी व अंमलबजावणी केली जात आहे. गावासोबतच देशातूनही कोरोना हद्दपार व्हावा, मानवी जीवन सुखी समाधानाने जगावे, मृत्यू सत्र थांबावे, भीतीचे वातावरण दूर व्हावे, असे साकडे मातामायकडे करण्यात आले. अनेक वर्षापूर्वी साथीच्या रोगाचे उच्चाटन करण्याकरिता वयोवृद्ध महिलांनी मातामायकडे साकडे घातले होते.
विज्ञान व तंत्रज्ञान युगात कितीही प्रगती झाली तरी आस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मानसिक आधार व बळ यामुळे प्राप्त होते. विश्वासाला आस्थेची साथ मिळाल्याने जीवनात बळ निश्चित मिळते यास महिलांचे एकीचे बळ महत्त्वपूर्ण आहे.