सालई येथील घटना : मुलाच्या खुनाचा प्रयत्न भंडारा : अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून आपल्या ३३ वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पाषाणहृदयी मातेला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी पाच वर्षे कठोर कारावासाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तुमसर तालुक्यातील सालई (बुज) येथे दि.११ जून २००९ च्या पहाटे सुमन लटारु तुमसरे (५०) हिचा मुलगा रामप्रसाद लटारु तुमसरे (३३) हा आंगणात झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. रामप्रसादचे आईशी पटत नव्हते. त्यामुळे रामप्रसाद हा पत्नी, मुलगी आणि वडिलांसोबत वेगळा राहत होता. दि.१० जून रोजी रामप्रसाद हा दोन मित्रांसोबत मजुरीच्या कामासाठी चारगाव (माडगी) येथे गेला होता. रात्री कामाहून परतल्यानंतर थकव्यामुळे तो आंगणात लेटून होता. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास त्याच्यावर प्रहार केल्यामुळे तो खळबडून जागा झाला. त्यानंतर पाहिले असता त्याच्या आईच्या हातात कुऱ्हाड दिसून आली. काही कळण्याच्या आत तिने कुऱ्हाडीने पुन्हा वार केल्यामुळे त्याने आरडाओरड केली. बाजूला असलेली त्याची पत्नीही जागी झाली. तिनेही आरडाओरड करीत असतानाच जखमी रामप्रसाद बेशुद्ध झाला. पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक धावून आले. त्यांनी रामप्रसादला बेशुद्ध अवस्थेत तुमसर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. घटनेची तक्रार त्याचा चुलत भाऊ हरिश्चंद्र तुमसरे याने तुमसर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी भादंवि ३०७, ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले. याप्रकरणात सरकार पक्षाकडून घटनेची प्रत्यक्षदर्शी रामप्रसादची पत्नी उर्मिला यांच्यासह एकूण आठ साक्षदारांचे बयान नोंदविले. यात रामप्रसादच्या खुनाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील राजकुमार वाडीभस्मे यांनी युक्तीवाद केला. (जिल्हा प्रतिनिधी)
मातेला पाच वर्षाचा कठोर कारावास
By admin | Published: September 10, 2015 12:28 AM