गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: जिल्ह्यातील रोजगार आणि पर्यटनात वरदान ठरु पहाणाऱ्या गोसे जल पर्यंटनाने बुधवारी एक पाऊल पुढे टाकले. या १०२ कोटीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत जल पर्यटनासाठी गोसेच्या आवश्यक ४५० एकर जागेकरिता पर्यटन विभाग आणि जल संपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा व आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या. यामुळे भविष्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता गोसे जल पर्यटनाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी प्रदान करण्याची घोषणा केली होती. काही दिवसातच या प्रकल्पाकरिता २५० कोटी रुपयांपैकी पहिला टप्पा म्हणून १०२ कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती. या वाटचालीत आता ४५० एकर जागेसाठीच्या सामंजस्य कराराचीही भर पडली आहे. ही प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर महिन्यात भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे.
या सामंजस्य कराराद्वारे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यासाठी तसेच व्यवस्थापन आणि चालविण्यास परवानगी दिली जाईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांसाठी ८० टक्के रोजगार प्राप्त होणार आहे.