गत अनेक वर्षांपासून भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील आनंदनगर भोजापूर रोड येथील वस्तीत समस्याच समस्या आहेत. अर्धवट रस्त्यांचे बांधकाम, सांडपाणी जाण्यासाठी अपुरी व्यवस्था, अपूर्ण नाल्यांची सुविधा असे अनेक समस्यांनी आनंदनगर वेढलेला आहे.
नाल्यांच्या असुविधांमुळे पावसाचे पाणी व घरातील सांडपाणी हे घरासमोर आणि खाली प्लॉट्समधे साचून राहते. जमा सांडपाण्यामुळे दुर्गधी, लहान तसेच प्रौढ व्यक्तींमधे डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड आजार बळावले आहेत. घरातील सांडपाणी रस्त्यावर सोडल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे. पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेतीचा व्यवसाय होत असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहतो. दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा खेळता-खेळता पाण्यात पडला होता. जीवितहानी न झाल्याने नगरवासीयांनी नगरसेवकांना तक्रार करून साचलेला पाणी काढण्याचे मध्यममार्ग अवलंबिण्यात आला होता. विविध प्रकारची भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येत नाही. घरासमोर आणि रस्त्यांवर असलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावे, तात्पुरती नाल्या तयार करून देण्यात यावे, जंतूनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावे आदी समस्यांवर फक्त विचार न करता त्यावर योग्य निर्णय घ्यावे, अशी मागणी आनंदनगरवासीयांनी केली आहे.