भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथे मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. परिणामी या गावात समस्यांचा डोंगर उभा झाला असून समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. विकासापासून दूर असलेल्या खुटसावरी गावातील समस्या निवारणासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जंबो समस्यांचे निवेदन सादर केले.
भंडारा तालुक्याच्या टोकावर असलेल्या खुटसावरी गावाची लोकसंख्या १२०० च्या घरात आहे. येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाल्या जीर्ण झाल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. स्मशानभूमी व शोक सभामंडपाचा या गावात अभाव आहे. गावाला पशूसंवर्धन दवाखाना श्रेणी १ असला तरी हा दवाखाना भाड्याच्या घरात आहे. जिल्हा परिषदेने पथदिव्यांचे देयके ग्रामपंचायतला अदा करण्याचा निर्णय घेतल्याने २० दिवसांपासून रात्रीला गावात अंधार असतो. सौरउर्जेचे पथदिवे गावात असले तरी ते नादुरुस्त आहेत. प्राथमिक शाळा जीर्ण झाले आहे. ग्रामपंचायत इमारतीची दुरवस्था आहे. यासह विविध समस्या गावामध्ये असल्या तरी त्या समस्या सोडविण्यात शासन प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील समस्या तातडीने सोडविण्यात याव्या यासाठी भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला व समस्यांचे निवेदन त्यांना सोपविले.
समस्या मार्गी लावणार
खुटसावरीला असलेली समस्या तातडीने सोडविण्यात येतील. लवकरच या गावामध्ये स्मशानभूमी सभामंडप तसेच शाळेचे बांधकामासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागाचा विकास हाच प्रमुख उद्देश असून ग्रामस्थांनी विकास कार्यासाठी सहकार्य केल्यास विकास शक्य आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.