दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका : खात रोड परिसरातील वास्तव, नगर पालिका प्रशासन लक्ष देणार काय?, नागरिकांचा सवालभंडारा : शहरातील खात रोड परिसरात स्थित रेल्वेलाईन जवळील डंपींग ग्राऊंडवर घाणीमुळे वातावरण दुर्गंधीयुक्त झाले आहे. परिणामी सदर डंपींग स्थळ अन्यत्र हलविण्यात यावे अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.खात रोड परिसरात भंडारा रेल्वे लाईन पासून ते मंगलमूर्ती सभागृहापर्यंत असलेली सांडपाण्याची नाली त्वरीत साफ करण्यात यावी, दत्त मंदिर, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड (प्रभाग क्र. ५ मधील) सन २००६ पासून बंद असलेले जलकुंभ सुरु करण्यात यावे अशी मागणीही दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. वॉर्डात समस्या असताना या संबधात येथील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिले. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. मंगलमूर्ती परिसरातील नाली पूर्णत: कचऱ्याने तुंबलेली आहे. पावसाळ्यापूर्वी ही नाली साफ करण्याची मागणी आहे. नालीत कचरा तुंबला असल्याने नालीतील सांडपाणी सतीश हारगुडे, सुधाकर नागपुरे, शहारे, मिरासे, ठवकर यांच्या घरात शिरत असते. यामुळे या कुटुंबातील सदस्यांवर आरोग्याचे संकट बळावले आहे. वॉर्डातील समस्या सोडवाव्या अशी मागणी क्रिष्णा सेवलेकर, विलास सळोदे, मते, सुनिता सेवलेकर, आरती सारंगपुरे, अशोक आदी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे लाईनजवळील डंम्पिग इतरत्र हलवा
By admin | Published: May 24, 2016 1:01 AM