दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर असलेले तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय गडकुंभली रोडवरील नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, जुन्या तहसील इमारतीत आताही कोषागार विभाग, रजिस्ट्री विभाग व केंद्र कार्यरत आहेत. या तीन विभागांत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तहसील कार्यालयाची प्रत्येक कागदपत्रे तयार करताना सेतू केंद्राची गरज असते. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जुन्या तहसील कार्यालयात होते. आलेल्या नागरिकांची वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. आधीच उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीची समस्या बिकट आहे, त्यातच ही अडचण भर घालत आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत प्रशस्त पार्किंगची जागा आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जुन्या तहसील कार्यालयाचे गेट उघडण्यात येत नाही. आतमध्ये पार्किंगला गाड्या लावण्याची परवानगी देत नाही. परिणामी येणाऱ्या-जाणाऱ्यांना आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करावी लागतात.
बॉक्स
अर्जनवीस जुन्याच जागेवर
दोन वर्षांचा कालावधी लोटला. अर्जनविसांना नवीन तहसील कार्यालय परिसरात नवीन जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, अजूनपर्यंत त्यांना नवीन तहसील कार्यालयात जागाच देण्यात आली नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण होत असून, अर्जनविसांना आजही ऊन व पावसातच बसावे लागते.
बॉक्स
नागरिकांना होतो त्रास
तहसीलची कागदपत्रे तयार करताना नागरिकांना आधी जुन्या तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रे तयार करावी लागतात व नंतर नवीन तहसील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. महिलांना पायी जाता-येताना अधिकच त्रास होतो. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.