पत्रपरिषद : प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा उदापुरेचा आरोपभंडारा : १७ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार भंडारा येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने रुग्णालय बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे सदर प्रस्ताव रखडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने जागा उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रविण उदापुरे यांनी दिला आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. त्यांच्या काळात या विषयाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय हे ४०० खाटांचे असून तब्बल १५० खाटा गर्भवती महिला, तसेच महिला रुग्णासाठी वापरल्या जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्य जिल्ह्यातील रुग्ण भरती होत असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासन व्यवस्थेवर ताण निर्माण होऊन आजारी महिलांना रुग्णालयात जमिनीवर झोपविले जाते. त्यामुळे दुर्धर आजाराचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालयाचा प्रस्ताव मान्य केला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालय बांधकामास सुरूवात झाली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात या कार्याला सुरूवात झालेली नाही. सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा आखण्यात आला होता. त्या आराखड्याच्या शर्तीनुसार भंडारा जिल्ह्यात १०० खाटांचे महिला रुग्णालय स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. सदर रुग्णालयाच्या जागेसाठी प्रारंभी जलशुद्धीकरण केंद्रा लगतच्या जागेची निवड करण्यात आली होती. परंतु पूरपिडीत असल्याचे कारण सांगून जागा रद्द करण्यात आली. नंतर नव्याने जागा शोधण्यास येवून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा लगतची दुग्ध संकलन केंद्राच्या जागेची निवड करण्यात आली. सदर जागा ८ एकर असून त्यासंदर्भात प्रस्ताव रखडला आहे. कागदाच्या पूर्ततेसाठीच व मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहारासाठी अनेक महिने लोटले असा आरोपही उदापुरे यांनी केला. (नगर प्रतिनिधी)
महिला रुग्णालयासाठी जागा न दिल्यास आंदोलन
By admin | Published: April 19, 2015 12:33 AM