साकाेली : साकाेली ग्रामपंचायतीचे पाच वर्षापूर्वी नगर परिषदेत रूपांतर झाले. सर्व प्रक्रिया व्यवस्थित सुरू असताना आता सेंदूरवाफावासीयांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. नगर परिषदेत समाविष्ट झालेल्या सेंदूरवाफाच्या विकास कामात दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप केला जात आहे. त्यामुळे आता साकाेली नगर परिषदेतून सेंदूरवाफा गाव वगळण्याच्या कामाला वेग आला आहे. शेकडाे नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून सेंदूरवाफा ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. मात्र २०१६ मध्ये साकाेली नगर परिषदेत ग्रामपंचायतचा समावेश करण्यात आला. यासाठी शासकीय स्तरावरुन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले नव्हते. केवळ राजकीय फायद्यासाठी मूठभर लाेकांनी नगर परिषदेला हाेकार दर्शविला, असा नागरिकांचा आराेप आहे. सेंदूरवाफा गावाची लाेकसंख्या १० हजारापेक्षा अधिक असताना फक्त १२१ लाेकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन नगर परिषद निर्मितीची प्रक्रिया करण्यात आली हाेती. विशेष म्हणजे साकाेली ग्रामपंचायत असताना असलेल्या १७ सदस्यांएवढीच सेंदूरवाफाची सदस्या संख्या हाेती. असे असताना सेंदूरवाफावासीयांची दिशाभूल करण्यात आली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे मिळणारे लाभही मिळत नाही.
बाॅक्स
विकास कामात दुजाभाव
विकासकामात साकाेलीला प्राधान्य देऊन सेंदूरवाफाला दुय्यम स्थान दिले जाते. नाव देतानाही साकाेली सेंदूरवाफा असे नाव देण्याचे ठरले हाेते. परंतु साकाेली नगर परिषद असेच नाव देण्यात आले. उलट नगर परिषदेमार्फत वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. सेंदूरवाफा गावातील राेजमजुरी करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागताे. नगर परिषद स्थापन हाेऊन पाच वर्षे झाली तरी अद्याप सेंदूरवाफाचा विकास दिसत नाही. त्यामुळे आता साकाेली नगर परिषदेतून वेगळे हाेण्याचा निर्णय गावकरी घेत आहेत.