नरेंद्र भोंडेकर यांचा सवाल : महिला रूग्णालयावरून श्रेयाची चढाओढलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात खासदारांसह तीन आमदार आहेत. तेसुद्धा सत्ताधारी भाजपाचे. असे असताना विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी आपल्यामुळे महिला रूग्णालयाला मंजुरी मिळाली असे सांगून श्रेय लाटत आहेत. याचा अर्थ लोकांमधून निवडून आलेले आमदार आणि खासदार निष्क्रीय तर नाही ना? येणाऱ्या निवडणुकीत खासदारांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न करून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याच पुढाकाराने १०० खाटांच्या स्वतंत्र महिला रूग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा दावा शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.आपण आमदार असताना भंडारा जिल्हा मुख्यालयी महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रूग्णालय व्हावे, यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्यावेळी आघाडीची सत्ता होती. विरोधी पक्षात असल्यामुळे निधी देण्यासाठी टाळाटाळ होत होती. त्यानंतर सत्तांतर झाले. सुदैवाने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आले. त्यादिवशीपासून आजपर्यंत सातत्याने महिला रूग्णालयासाठी पाठपुरावा करीत आहे. हा विषय आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्याकडे रेटून धरला. डॉ.सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आपल्या कार्यकाळात भंडाऱ्यात महिला रूग्णालय व्हावे, अशी त्यांची ईच्छा आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे महिला रूग्णालयाचा विषय लांबणीवर पडला होता. त्यानंतर आपण मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि मुख्य सचिवांकडे हा विषय लावून धरला होता. सरकाने उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने सकारात्मक अहवाल दिल्यानंतर सरकारने ४३.८४ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. असे असताना केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपने भुलथापा देऊन सत्ता स्थापन केली. परंतु मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकही नवीन उद्योग नवीन योजना न आणता शिवसेनेने पाठपुरावा केलेल्या महिला रूग्णालयाच्या विषयाचे राजकारण करून आयते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगून दुसऱ्यांच्या आयत्या मुद्यांचे स्वत: श्रेय लाटू नका, असा सल्लाही भोंडेंकरांनी फुकेंना दिला. भंडारा जिल्ह्यात विकासाची कामेच करायची आहे तर आपण आमदार म्हणून आहात तेवढ्या दिवसात भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा, मुंडीपार येथील बहुप्रतिक्षित ‘भेल’ कारखाना सुरू करा, शहरात रॅक पार्इंट सुरू करा, अड्याळ तालुका निर्मिती, गोसेखुर्द पुनर्वसन व पेंचचे कार्यालय पुनर्जीवित करुन भंडाऱ्यात ठेवण्यात यावे, सांस्कृतिक भवन, औद्योगिक क्षेत्र वाढविणे, पांडे महालाला संग्रहालय करणे, जिल्ह्यातील ओबीसी लोकांना घरकुल व शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, पाचगाव येथे नवोदय विद्यालयाच्या ईमारतीचे बांधकाम करून शाळा सुरू करणे आदी कामे करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, संजय रेहपाडे, सुर्यकांत इलमे उपस्थित होते.
आमदार-खासदार निष्क्रिय आहेत का ?
By admin | Published: July 11, 2017 12:20 AM