भंडारा : खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांचे फेसबुक पेज हॅक झाले असून या पेजवरून कुठलाही आपत्तीजनक मजकूर पसरविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा मजकुरावर खात्री करूनच विश्वास ठेवावा, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
खासदार सुनील मेंढे यांचे फेसबुक पेज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हॅक करण्यात आल्याचे पेजचे संचलन करणाऱ्या टीमच्या लक्षात आले. पेज हॅक झाल्यामुळे पेजचे ॲडमिन ते नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या फेसबूक पेजेचा दुरूपयोग होऊन त्या माध्यमातून कुठलेही आपत्तीजनक आणि समाजविघातक कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता याची माहिती देण्याच्या दृष्टीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवताना खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.