भंडारा : तुमसर रेल्वेस्थानकावरील अडीअडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी आज तुमसर रेल्वेस्थानकात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि स्टेशन समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील जुन्या असलेल्या तुमसर रेल्वेस्थानकात बऱ्याच समस्या आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. रेल्वेस्थानकाच्या बाजूला समांतर रोड तयार करण्यात यावा, असा विषय चर्चेत आल्यानंतर त्या अनुषंगाने खासदार यांनी अधिका-यांना निर्देश दिले. तुमसर शहर स्थानक ते रामटेकपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी, असेही खासदारांनी सांगितले. रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या बसस्थानकाची नियमित स्वच्छता व्हावी, रेल्वेस्थानकाजवळ नवीन तिकीटघर आणि प्रवाशांसाठी शेड उभारण्यात यावे, मागील अनेक वर्षांपासून स्टेशनच्या बाहेरपर्यंत फूट ओहर ब्रीजची मागणी करण्यात येत आहे.
प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करण्यात यावे, असे निर्देशही या बैठकीत खासदार मेंढे यांनी दिले. या रेल्वेस्थानकावरून शेकडो प्रवासी नियमित प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेस्थानकाची स्वच्छता आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मुन्ना पुंडे, सरपंच रिताताई मसरके, सुनील पारधी, आशीष कुकडे, राजाभाऊ लांजेवार, कल्याणी भुरे, संतोष वहिले, सुनील दमाहे, नानू बिरणवार, सुरेंद्र सव्वालाखे व आदी मान्यवर उपस्थित होते.