भंडारा : कोरोना संसर्गाचा फटका फक्त उद्योग जगतालाच नव्हे; तर स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. एमपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी परीक्षा नियमित वेळेत होत नसल्याने तसेच परीक्षा झाल्या तरी मुलाखत, अंतिम निवड यादीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने दोन वर्षांपासून ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यातच आता पुणे येथील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. ३१ जुलैपूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र, स्वप्नील लोणकरचा गेलेला जीव परत येणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत. आज स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून असंख्य तरुण शहराच्या ठिकाणी भाड्याने खोली करून पोटाला चिमटे काढत रात्रंदिवस परीक्षेची तयारी करत आहेत. हे चित्र दिसत असले तरी एकीकडे पदांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे स्पर्धा वाढत असल्याने अनेक तरुणांना काही प्रसंगी नैराश्य येते. मात्र, त्यातही अनेकजण अडथळ्यांवर मात करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. हा सकारात्मक विचार करूनच अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळकाढू धोरणामुळे निश्चित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे यापुढे तरी स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने एमपीएससीच्या परीक्षा, मुलाखती, नियुक्तीपत्र ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
बॉक्स
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी होणार जाहीर
स्पर्धा परीक्षेची तारीख जाहीर होईल, या आशेने हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात तयारीसाठी राहिले आहेत. दोन वर्षात तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच कोरोनामुळे अनेकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे.
बॉक्स
ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार
कोरोनामुळे राज्यात शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. मात्र, प्रत्यक्ष अध्यापन आणि ऑनलाईन अध्यापन यामध्ये खूप फरक असल्याचे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले. कोरोनामुळे कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. गत वर्षात कोचिंग क्लासेसमध्ये मुलांनी ऑनलाईन शिक्षण घेऊन सराव चाचण्या दिल्या आहेत. यंदा मात्र मुले ऑनलाईनऐवजी ऑफलाईन कोचिंगचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे सरकारने निवडक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले
कोरोना संसर्गाचा परिणाम हा एमपीएससी परीक्षा, निवड पद्धती या सर्व प्रक्रियेवर होत आहे. मागील वर्षी एमपीएससीच्या परीक्षा कोरोनाकाळात पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लोकसेवा आयोगाच्या दुर्लक्षितपणाचा लाखो तरुणांना फटका बसत आहे.
परीक्षार्थी
कोट
पुणे येथील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचा आयोगाने केलेल्या विलंबामुळे बळी गेला आहे. अनेक मुलांचे वय निघून चालले आहे. त्यामुळे अनेक वर्षे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून केलेली तयारी शासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जात आहे. यामुळे तरुणांच्या पदरी निराशा येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परीक्षार्थी
कोट
क्लास चालकही अडचणीत...
कोरोनामुळे ऑफलाईन क्लासेस घेणे बंद झाले आहे. ऑनलाईन क्लासला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. एमपीएससीच्या परीक्षा होत नसल्याने मुलेही आता त्रासली आहेत. त्यामुळे शासनाने एमपीएससीच्या परीक्षा वेळेत घ्याव्यात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी खचून न जाता सकारात्मक विचार करून शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
प्रा. सुहास ढेकणे, क्लासचालक
कोरोनामुळे क्लासेस बंद होत असल्याने क्लासेस चालकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच एमपीएससीची जाहिरात, परीक्षा, निकाल, नियुक्तीची प्रक्रिया ही सर्व प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे मुलांमध्ये रोष निर्माण होत आहे. लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परीक्षा व निवड प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
प्रा. आनंत वाघमोडे, क्लासचालक