भंडारा : अडीच महिन्यांनंतर लालपरी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने धाऊ लागल्याने अनेक बसस्थानकांतील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी आता रुळावर आली आहे. भंडारा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. पूर्वीप्रमाणेच आता बसस्थानके हाउसफुल दिसून येत आहेत.
भंडारा -नागपूर, भंडारा - तुमसर, भंडारा - साकोली, गोंदिया मार्गावर अनेक बसेस धावत आहेत. मात्र, अजूनही अनेक एसटी कर्मचारी संपावर अडून असले तरी आता एसटीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंत्राटी चालकांचा नवा मार्ग शोधून बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी आता फारसा फरक पडणार नाही. लालपरी रस्त्यावर धाऊ लागल्याने सामान्य प्रवाशांसह बसस्थानकांतील विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.
आजी, यांचा संप झाला, पण आम्ही उपाशी मेलो ना...
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी दुखवटा जाहीर केल्याने एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. याचा मोठा फटका बसस्थानकातील विक्रेत्यांना, स्टॉलधारकांना बसला होता. एकीकडे एसटीला वर्षभराची रक्कम दिली तर दुसरीकडे दोन महिने बसस्थानकात शुकशुकाट असल्याने विक्रेत्यांना घर चालविणेही कठीण झाले होते. यामुळे विक्रेते आजी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला खरा, पण आम्ही मात्र उपाशी मेलो ना, असे सांगत होते. ते दोन महिने कसे काढले आमचे आम्हालाच माहीत. आता हळूहळू बसस्थानकातील चित्र बदलत असल्याने समाधान आहे.
मी वीस वर्षांपासून बसस्थानकात चॉकलेट, बिस्किटे विकत आहे. दिवसभर काम करून दोनशे रुपयांची रोजी मिळते. मात्र, एसटी संपामुळे तेही काम बंद पडले होते. काय खावे, ही पंचायत होती. संपाचा मोठा फटका आम्हाला बसला.
विक्रेता
मी अन् माझा मुलगा आम्ही हाच व्यवसाय गेली अनेक दिवसांपासून करीत आहोत. पाणी बॉटल, खाद्यपदार्थ विक्रीतून कसे तरी दोन पैसे मिळतात. एकीकडे एसटीला वर्षभराचे पैसे द्यावे लागतात अन् दुसरीकडे कोरोनामुळे आम्ही फार अडचणीत आलाे. सरकारने आम्हाला मदत करावी.
विक्रेता
भंडारा विभागात ६८ एसटी बसेसच्या १२३ बसफेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक आगारातून प्रवाशांचा प्रतिसादही वाढतो आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क, सॅनिटायझर वापराला प्राधान्य द्यावे, यासाठी आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. नागपूर मार्गावर आणखी एसटी बसेस वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
महिंद्रा नेवारे, वाहतूक नियंत्रक, भंडारा