सरस्वता नारायण तुमसरे (७५) रा. सालई बुज असे मृत आईचे नाव आहे. याप्रकरणी गौरीशंकर नारायण तुमसरे (३४) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी सरस्वताबाई स्वयंपाक घरात मृतावस्थेत आढळली होती. घरच्यांनी अंत्यविधीची तयारी सुरु केली होती. दरम्यान तुमसर पोलिसांना खून झाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तुमसर येथे रवाना केला. दरम्यान मंगळवारी याप्रकरणी पोलिसांनी घरातील काही मंडळींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु नेमका काय प्रकार आहे हे कळायला मार्ग नव्हता. बुधवारी याप्रकरणी पोलिसांनी मुलगा गौरीशंकर तुमसर याला अटक केली.
सरस्वताबाई यांना मुलगा गौरीशंकरने दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली होती. परंतु पैसे दिले नाही त्यामुळे तिच्यासोबत भांडण करुन स्वयंपाक खोलीत लोखंडी पावशीने तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यात ती जखमी होऊन मरण पावली. त्यावरुन पोलिसांनी गौरीशंकर तुमसरे याला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धंदर करीत आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.