भंडारा : घरगुती वादात दोन चिमुकल्यासह मातेने विष प्राशन केल्याने चौदा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील ठाणा येथे घडली होती. याप्रकरणी आता जवाहरनगर ठाण्यात मातेविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना ज्ञानेश्वर सहारे (३६), रा. महात्मा फुले वाॅर्ड ठाणा, ता. भंडारा असे गुन्हा दाखल झालेल्या मातेचे नाव आहे. १३ डिसेंबरच्या रात्री वंदनाने मुलगा कार्तिक ज्ञानेश्वर सहारे (१४ महिने), विधी ज्ञानेश्वर सहारे (५) या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही प्राशन केले होते. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तिघांनाही दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. परंतु, मंगळवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कार्तिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सध्या वंदना आणि विधी या दोघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणाची कागदपत्रे जवाहरनगर ठाण्याला प्राप्त झाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून वंदना सहारे यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३०७ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप वंदनाला अटक करण्यात आली नाही. अधिक तपास ठाणेदार बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मुलांच्या धिंगामस्तीने वाद
कार्तिक आणि विधी हे दोन चिमुकले नेहमी घरात धिंगामस्ती करीत होते. १३ डिसेंबर रोजी घरात त्यांनी मौजमस्ती केली. त्यावेळी त्यांना आई वंदनाने मारहाण केली. त्यावरून पती ज्ञानेश्वर सहारे याच्यासोबत वाद झाला. या वादाच्या रागातच तिने स्वत:सह आपल्या दोन चिमुकल्यांना विष प्राशन केले. तांदळात किडे होऊ नये म्हणून टाकण्याचे सल्फास हे कीटकनाशक विकत आणले. त्याचे द्रावण करून प्रथम दोन मुलांना व नंतर वंदनानेही प्राशन केले. त्यात कार्तिकचा मृत्यू झाला होता.