लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खुनासह वाटमारी आणि विविध गुन्हे शिरावर असलेल्या एका सराईत गुंडाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शहरातील जुना बसस्थानक परिसरात बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली आहे.बाबू बॅनर्जी (३५) राहणार जगनाडे नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी तो जुना बसस्थानकाजवळील काली मंदिरासमोरील गल्लीतून जात होता. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्या पोटावर वार केल्याने आतडी बाहेर आली होती. रक्ताच्या थारोळ्यात कोसळून बाबू जागीच ठार झाला. दरम्यान अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंह बिसेन आणि ठाणेदार मनोज सिडाम यांनी घटनास्थळ गाठले. शहरात खून झाल्याची माहिती होताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून बाबूचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविला आहे.बाबू बॅनर्जी हा सराईत गुंड असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, वाटमारी यासारखे अनेक गुन्हे आहेत. काही वर्षापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आले होते. शहरात त्याची चांगलीच दहशत होती. वाटमारीच्या एका प्रकरणात जानेवारी महिन्यात बाबू बॅनर्जी याला सात वर्षाची जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. मात्र उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर त्याची दोन महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुमसर शहरात वावरत होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी तो जुना बसस्थानकाजवळील काली मंदिरासमोरील गल्लीतून जात होता. त्यावेळी संधी साधून अज्ञात इसमांनी त्याला अडवून सपासप वार केले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध जारी केला असून वृत्त लिहिपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. शहरात बाबू बॅनर्जीचा खून झाल्याची माहिती होताच एकच खळबळ उडाली आहे. बाबू बॅनर्जीचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गुन्हेगारीतील वर्चस्वातून त्याचा काटा तर काढण्यात आला नसावा ना ? असा संशय व्यक्त होत आहे.हल्लेखोरांचा शोध सुरुकुख्यात बाबू बॅनर्जी याचा खून करून पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध तुमसर पोलिसांनी सुरु केला आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरून आल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन व ठाणेदार मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात मध्यप्रदेश व नागपूरवर शोध केंद्रीत करण्यात आला आहे.
तुमसरमध्ये सराईत गुंडाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM
बाबू बॅनर्जी (३५) राहणार जगनाडे नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी तो जुना बसस्थानकाजवळील काली मंदिरासमोरील गल्लीतून जात होता. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्या पोटावर वार केल्याने आतडी बाहेर आली होती.
ठळक मुद्देशस्त्राने सपासप वार : अज्ञात इसमांनी वाटेत अडवून केला हल्ला, शहरात खळबळ