लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बेला येथील प्राॅपर्टी डीलर्सचा खून जमिनीच्या वादातून चार लाख रुपयांची सुपारी देऊन केल्याचे उघड झाले असून, भंडारा शहर पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली आहे. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. राहुल गोवर्धन भोंगाडे (२६), रा. सुभाष वॉर्ड शुक्रवारी, भंडारा, श्रीकांत मदनलाल येरणे (३१), रा. चुरडी, ता. तिरोडा हल्ली मु. सुभाष वॉर्ड शुक्रवारी, आकाश रमेश महालगावे (२३) रा. अभ्यंकर वॉर्ड तुमसर, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. प्राॅपर्टी डीलर्स समीर बकीमचंद्र दास यांचा ४ एप्रिल रोजी गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांकडे होते. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला असता राहुल भोंगाडे याच्या आजीविरुद्ध समीरदास यांचा जमिनीचा वाद सुरू होता. दास यांनी आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याने त्यांचा काटा काढण्याचे राहुलने ठरविले. त्यासाठी त्याने श्रीकांत येरणे याला चार लाख रुपयांची सुपारी दिली. दोन लाख रुपये ॲडव्हान्सही देण्यात आला. २० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर दास यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात दास बचावले. त्यानंतर श्रीकांतने तुमसर येथील मित्र आकाश महालगावे याला सोबत घेऊन ठार मारण्याचा कट रचला. ४ एप्रिल रोजी आकाश व श्रीकांत दुपारी १.३० वाजता दास यांच्या पोस्ट ऑफिसजवळील कार्यालयात गेले. मात्र, दास तेथे हजर नव्हते. तेथे असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने दास यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. आपल्याला प्लॉट विकत घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यावरून दास यांनी त्यांना रॉयल पब्लिक स्कूलजवळ बोलाविले. तिघेही बेला येथील राजीवनगरातील लेआऊटवर गेले आणि तेथेच गळा चिरून दास यांना ठार मारले. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून या प्रकरणाचा छडा लावत तिघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अरविंदकुमार जगने, पोलीस हवालदार बापूराव भुसावळे, प्रशांत भोंगाडे, अतुल मेश्राम, अजय कुकडे, भेनाथ बुरडे, गणेश मन्नाडे, संदीप बन्सोड यांनी केला.
अवघ्या १२ मिनिटांत काम तमाम
समीरदास याने बोलाविल्याप्रमाणे तिघेही रॉयल पब्लिक स्कूलजवळ पोहोचले. बेला येथील ले-आऊटवर पोहोचल्यानंतर बोलता बोलता आरोपी श्रीकांत येरणे याने त्याच्याजवळील चाकू काढला आणि समीर यांच्या मानेवर जोरात वार केला. समीर यांना ओरडण्याची, बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. ते खाली कोळसळताच हे तिघेही पसार झाले. अवघ्या बारा मिनिटात त्यांनी समीर दास यांचे काम तमाम केले. विशेष म्हणजे हे तिघेही तोंडाला कापड बांधून होते. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण झाले होते. मात्र, पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावला.