भंडारा : लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे सासरच्यांनी गर्भवती नवविवाहितेचा अनन्वित छळ करून सासरच्यांनी तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती, दीर आणि सासूला लाखांदूर पोलिसांनी अटक केली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील डाभेविरली येथील रंजनाचा विवाह गत मार्च महिन्यात चप्राड येथील होमराज बगमारे याच्यासोबत झाला होता. सुरुवातीचे दोन महिने सुखात गेले. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची गळ रंजनाला घातली. रंजनाने एक लाख रुपये आणण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे गत चार महिन्यांपासून सासरच्यांनी रंजनाचा अतोनात छळ सुरू केला. दरम्यान, ती गर्भवती झाली. मात्र छळ वाढतच गेला. सोमवारी सासरच्यांनी माहेराहून एक लाख आणण्यावरून रंजनाला बेदम मारहाण केली, तर मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रंजना मृतावस्थेत आढळून आली. सासरच्यांनी साडीने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले.
या घटनेची माहिती रंजनाच्या माहेरच्यांना व लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रंजनाचा भाऊ सोमेश्वर बुराडे, रा. डांभेविरली यांनी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पती, सासू व दिराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. रंजना होमराज बगमारे (२५), असे मृत सुनेचे नाव आहे, तर पती होमराज जनार्दन बगमारे (२८), सासू प्रमिला जनार्दन बगमारे (५५) व दीर संजय जनार्दन बगमारे (२६), सर्व रा. चप्राड, अशी अटक करण्यत आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेचा तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.