दिघोरी (मोठी) : आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने लाखांदूर तालुक्यातील मुर्झा गावच्या सरपंचाचे पद रिक्त ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. दरम्यान, उपसरपंचपदी राहुल उके यांची निवड करण्यात आली.
आरक्षण सोडतीत मुर्झा गावचे सरपंच अनुसूचित जमाती महिलेसाठी निघाले होते. मुर्झा हे गट ग्रामपंचायत असून झरी व मालदा गावांचा समावेश आहे. मात्र, झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जमातीची महिला निवडूनच आली नाही. त्यामुळे सोमवारी सरपंचपद रिक्त ठेवण्याची वेळ आली. पुढील आदेशापर्यंत निवडणूक लांबविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील ठवरे यांनी सांगितले. दरम्यान, उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. भाजपप्रणीत आघाडीचे राहुल उके (मालदा) यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीचे उमेदवार छगन हेमणे यांचा पाचविरूद्ध चार मतांनी पराभव केला. यावेळी भाजपचे माधव झोडे, भोलाराम दलाल, मंगेश ठाकरे, प्रकाश बोरकर, निर्मला झोड, ज्ञानेश्वरी सोनवणे आदींनी जल्लोष केला.