भंडारा : कोरोना संसर्ग सुरू झाला आणि सख्खी रक्ताची नातीही दुरावली. असाच काहीसा अनुभव अनेकांना येत आहे, तर दुसरीकडे अनेक माहेरवाशिणींना आपले सासर सोडून कित्येक महिने झाले तरी माहेरी जाता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मनाची घालमेल ही शब्दात व्यक्त न करण्यासारखी आहे.
फक्त फोनवरूनच माहेरातील कुटुंबीयांशी दरराेजचे बोलणे होत असले तरी मात्र प्रत्यक्षात आपला माहेरी मात्र कोरोनामुळेच जात आलेले नाही. त्यातच कोणाचे आई, वडील, भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईक जरी कोरोनाने दगावले असले तरी अखेरचे अंत्यसंस्कारही करता आले नाही, अशी भावना अनेक माहेरवाशिणींनी बोलून दाखविली. कोरोना संकट लवकर दूर व्हावे, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
कोट
माझे माहेर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तुमसर आहे. तसे पाहिले तर गाडीवर एकाच दिवसात जाऊन परत येता येते. मात्र कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून मला माहेरी जाता आलेले नाही.
- प्रियंका दुधबरैय्या, भंडारा
कोट
मी नोकरीनिमित्ताने काटोल येथे स्थायिक झाले आहे. माझे माहेर भंडारा आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत; परंतु कोरोना संसर्ग कधी, कुठे होईल हे सांगता येत नाही. मुलेही लहान असल्याने माहेरी गेलेली नाही.
- माधुरी दूधकवडे, काटोल
कोट
माझे माहेर गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे जाण्यासाठी नियमित एसटी बसेस सुरू नाही. त्यात गेलेच तर परत येण्याची सुविधा नाही. कोरोना वाढतच असल्याने माहेरी जाण्याची ओढ लागली आहे.
- वनिता बागडे, नागपूर
कोट
माझी मुलगी प्राध्यापिका आहे. ती जानेवारी महिन्यात आली होती. त्यावर पुन्हा कोरोना वाढल्याने येताच आलेली नाही. माझी दोन्ही नातवंडे लहान आहेत. सारखे मामा मामा करतात. येता येत नाही.
- माया मेश्राम, भंडारा
कोट
माझी मुलगी भंडाऱ्यात दिली आहे. जावई नोकरी असल्याने सुटी मिळत नाही. लहान मुलीचे लग्न होते. मात्र तेही पुढे ढकलल्याने खूप दिवस झाले तरी मुलीला येता आले नाही.
- शीलाबाई दूधबरई, तुमसर
कोट
माझी मुलगी अधूनमधून येत असते, परंतु मीच आता कोरोना वाढला असल्याने स्वत:ची काळजी घेत काही दिवस न येण्याचा सल्ला दिला आहे. मुलगी माहेरी आल्यावर मन भरून येते.
- मालताबाई सोनवाने, भंडारा
कोट
मामाच्या गावाला गेल्यावर खेळण्याची, खाऊ खाण्याची नुसती धमाल असते. पण कोरोनाने पप्पा-मम्मी गावाला जायला नको म्हणतात.
- साहिल घुगे, पुणे
कोट
मामाचे गाव लांब आहे. गावाला गेल्यावर खूप खूप मज्जा येते. मामाच्या गावावरून परत येऊच नये, असे वाटते; पण कोरोनाने जाताच आले नाही.
- रुद्र घुगे, पुणे
कोट
आमचा मामा मला पाहिजे तो खाऊ देतो. शेतात, गावात गाडीवर कुठेही फिरायला मिळते. शिवाय अभ्यासाचे टेन्शन नसते.
- प्रांजल घुगे, पुणे