इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) हा आजार उदभवत आहे. जिल्ह्यात या आजाराचे पाच रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा आजार संपर्कामुळे होत नसल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे, मात्र कोवीड नियमांचे पालन करणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.कोरोना महामारीसोबतच अन्य आजारही समोर येत आहेत. त्यात म्युकरमायकोसिस हा आजार आता सतावत आहे. हा आजार रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही तर स्वतःची बेफिकिरी आणि नियमांचे पालन न करणे, यामुळे होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्यास व त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास व त्याच स्थितीत तो नियमांचे पालन न करता रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्याला आजार उदभवू शकतो. मात्र मधुमेह व प्रतिकारक्षमता कमी असल्यास त्यालाही हा आजार होऊ शकतो. अशा स्थितीत काळजी आणि फक्त काळजी हेच त्यावर रामबाण औषध आहे. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेऊन त्यावर औषधोपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी म्युकरमायकोसिस याला हलक्यात न घेता त्यावर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
औषधींचा पुरेसा साठा कधी मिळणार? n भंडारा जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण उपचार घेत असून अन्य दोन रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारावर प्रभावी असलेले इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. औषधींची कमतरता नसल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढल्यास त्याअनुषंगाने औषधेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात औषधांची टंचाई उद्भवू नये म्हणून आरोग्य प्रशासन त्या दिशेने पाऊल टाकत आहे.
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, सोबतच कान,नाक,घसा, नेत्र व दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करावी, सांगितल्यापेक्षा जास्त स्टिरॉइड न घेणे, टुथब्रश, मास्क वरचेवर बदलणे, गुळण्या करणे, वैयक्तीक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात, मातीत काम व खतांचा वापर करताना पूर्ण बाहीचा शर्ट, तात ग्लोव्हज व मास्क घालणे आवश्यक आहे.
डॉक्टर म्हणतात...
ज्या व्यक्तीला मधुमेह व त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, अशांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असू शकतो. मधूमेहावर नियंत्रण, रोगप्रतिकार क्षमता वाढविणे व कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही.डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा
जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजाराची औषधे उपलब्ध आहेत. इंजेक्शन सुद्धा उपलब्ध असून नागरिकांनी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. उपचार हेच त्यावरील योग्य निदान आहे. कुठल्याही अफवांना बळी पडू नये.- डॉ. निखिल डोकरीमारे, अति. जिल्हा शल्य चिकीत्सक, भंडारा
कुणालाही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला तर घ्यावा सोबतच कान, नाक, घसा व डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळीच औषधोपचार करून सुरक्षित राहता येईल. काळजी घेतल्यास रोग बरा होतो. मानसिकरित्या खचून न जाता उपचारावर विश्वास ठेवा.- डॉ. प्रमोद धुर्वे, ईएनटी तज्ज्ञ, भंडारा
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे - या आजारात चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव वाहने, चेहरा- डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे, दात दुखणे व हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप अशी लक्षणे दिसू लागतात.