प्रशासनाचा निषेध : चौकशी करून कारवाईचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासनभंडारा : साकोली येथील नाभिक समाजाचे हुतात्मे 'वीरभाई कोतवाल' स्मारक भूमीसाठी समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड करून मूर्तीची विटंबना करुन चोरी करण्यात आली. या निषेधार्थ शनिवारी नाभिक समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता केली.मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा भंडाराचे अध्यक्ष मधुभाऊ फुलबांधे, सचिव विजय घोटेकर, अशोक फुलबांधे यांनी केले. दुपारी १ वाजता हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमूर्ती चौकात धडकला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला मधुभाऊ फुलबांधे, केशव सूर्यवंशी, राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर फुलबांधे, पाटील, विदर्भ विभागीय संघटक अशोक फुलबांधे यांनी मार्गदर्शन केले. सभेत ते म्हणाले, १४ सप्टेंबर रोजी प्रशासनातर्फे समाजातील प्रतिनिधींना लेखी किंवा तोंडी पूर्व सूचना न करता गडकुंभली रोड मौजा साकोली येथील वीरभाई कोतवाल स्मारक भूमीवरील समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराजांच्या मंदिराची तोडफोड करून मूर्तीची विटंबना केली. तसेच मूर्ती चोरून नेली. नाभिक समाज भवनाचे बांधकाम, तारेचे कुंपण, सीमेंटचे खांब, टिनाचे शेड, मंदिरातील पूजेचे साहित्य यांची नासधूस केली. हा नाभिक समाजावर अन्याय आहे. या घटनेचा महामंडळ व समाजबांधवातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. २५ वर्षापासून नाभिक महामंडळ शाखा साकोली यांनी स्मारकाच्या भूमीसाठी वारंवार मागणी केली. अनेकदा लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने समाजाचा व संतांचा तसेच हुतात्म्यांचा विचार न करता तोडफोड केली आहे. घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांची भेट घेऊन निषेधाचे पत्र त्यांना सोपविले. शिष्टमंडळात राष्ट्रीय महासचिव प्रभाकरराव फुलबांधे, अंबादास पाटील, कुंडलीक केळझरकर, विजय घोटेकर, केशव सूर्यवंशी, हेमंत मेश्राम, जगदीश सूर्यवंशी, सुरेश जांभुळकर, मंगलदास फुलबांधे, गोपाल मेश्राम, राजू कुकडकर यांच्यासह शेकडो समाजबांधवांचा सहभाग होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. (नगर प्रतिनिधी)
नाभिक समाजाचा मोर्चा
By admin | Published: September 20, 2015 1:11 AM