तालुक्यात चुलबंद व वैनगंगा या दोन नद्यांच्या घाटातून मागील काही महिन्यांपासून नियमित रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. उपसा व वाहतूक रात्रीच्या सुमारास जेसीबी मशिनसह ट्रॅक्टर व टिप्परने राजरोसपणे सुरू आहे. गत काही महिन्यांत तालुक्यातील टेंभरी, विहिरगाव, भागडी, आथली, आसोला, दिघोरी/मोठी, खोलमारा, धर्मापुरी आदी नदीघाटातून तस्करांनी कोट्यवधी रुपयांच्या रेतीची तस्करी केल्याची माहिती आहे. या तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल हेतूपुरस्पर बुडविला जात असल्याची संतापजनक चर्चा आहे.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास तस्करांकडून रेतीची अवैध तस्करी होताना स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तालुक्यात शासनाने नांदेड येथील रेती घाट लिलाव केला असताना अन्य नदीघाटातून बेधडकपणे सुरू असलेली रेती तस्करी रोखण्यात संपूर्ण प्रशासन अपयशी ठरले आहे. तथापि, झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने रोजगाराच्या नावाखाली तालुक्यातील काही तस्करांकडून बेधडक रेती तस्करी सुरू असताना शासन प्रशासनाकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात आहे. दरम्यान, गत जुलै महिन्यात तालुक्यातील टेंभरी, विहिरगाव नदीघाट परिसरात शेकडो ब्रास अवैध रेतीसाठा जप्त होऊनही तस्करांच्या बचावासाठी तालुका प्रशासनाने चोरट्यांची नावे माहीत होऊनदेखील कारवाई न करता प्रकरण दडपल्याची ओरड केली जात आहे.
एकंदरीत भर पावसाळ्यातही रात्रीच्या सुमारास बेधडकपणे रेतीची अवैध तस्करी होताना शासन प्रशासनाकडून तस्करांविरोधात कोणतीच कारवाई केली जात नसल्याने तालुक्यातील सर्व नदीघाट तस्करांचे केंद्र बनले आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रात्रीच्या सुमारास नदीघाटातून सुरू असलेली रेतीची अवैध तस्करी रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.