भंडारा : नागरिकांची आणि पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या नईम शेख याच्या खळबळजनक सिनेस्टाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष डहाट असे त्याचे नाव असून तो हिस्ट्री सीटर आरोपी आहे. त्याच्यासह अन्य सहा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. या खून प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार आहेत.
तुमसर तालुक्यातील गोबरवही येथे सोमवारी सायंकाळी ५:१५ वाजता झालेल्या खुनानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. रात्रीच गोबरवाही जवळील हेटी या गावातून चार जणांना अटक केली. या अटकेतील आरोपींनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट हा असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री पुन्हा त्याच्यासह अन्य एकाला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये संतोष डहाट (३३, आंबेडकर वार्ड, तुमसर), शुभम उर्फ सागर पंधरे (नवीन हसारा टोली तुमसर), गुणवंत उर्फ अतुल यवकार (३०, नाका वाडी, नागपूर), आशिष नेवारे (३२, जयताळा, नागपूर), रवी रतन बोरकर (३५, इंदुरा बाराखोली चौक, जरीपटका नागपूर) आणि दिलखुश उर्फ मोनू कोल्हटकर (२८, मालवीय नगर गौतम पेठ तुमसर) यांचा समावेश आहे. यासोबतच सतीश डहाट (२७, आंबेडकर वार्ड तुमसर), विशाल मानेकर (३२, हुडको कॉलनी नागपूर) आणि अमन मेश्राम (२९, आंबेडकर वार्ड तुमसर) हे तीन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींवर कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ सह कलम ३/२५, ४/२५, २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेत उतरणीय तपासणीसाठी नागपूरला
देशी कट्ट्याच्या गोळ्या झाडून नईम शेख याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर चाकूने गळा कापण्यात आला होता. त्याच्या मृत्यूच्या अधिक चौकशीसाठी आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला असून तिथे शवविच्छेदनंतर नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार आहे.
चार आरोपी नागपुरातले
या घटनेमध्ये पोलिसांच्या यादीत आलेल्या नऊ आरोपींपैकी चार आरोपी नागपूर येथील असून हिस्ट्री सीटर आहेत. तर संतोष डहाट आणि सतीश डहाट हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.
वर्षभरापूर्वी झालेल्या गोळीबाराचा बदला
सुमारे वर्षभरापूर्वी नईम शेख याने आपल्या हस्तकांकरवी संतोष डहाट याच्यावर गोळीबार केला होता. मात्र सुदैवाने त्यातून तो बचावला. यामुळे संतोष या घटनेचा बदला घेण्याची संधी शोधातच होता. दरम्यान त्याने नवीन शेख यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवून व त्याचे लोकेशन माहीत करून सोमवारी त्याचा गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ गेम केला. वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.