राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची दिनांक १ मार्चऐवजी आता १५ मार्च तर मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची दिनांक ८ मार्चऐवजी ३१ मार्च केली आहे. या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याच्या तक्रारी होत्या. होणाऱ्या निवडणुका या प्रभागानुसार होणार आहेत. एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्याच प्रभागामध्ये दर्शविण्यात आले असल्याची अनेकांच्या तक्रारी होत्या. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी वेळ नसल्याने नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होणार होती. त्यांना या कामासोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे कार्यसुद्धा करणे आवश्यक होते. अशात काही नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरतासुद्धा आहे. ही बाब ओळखून निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता या याद्या १५ व ३१ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची मात्र दिनांक वाढल्याने मोठी अडचण झाली आहे.
नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:07 AM