रेल्वे कॉरिडोरचे सर्वेक्षण पूर्ण : ताशी १६० किमी वेग, ९६४ पैकी ३०० कोटी मंजूरमोहन भोयर तुमसरनागपूर ते बिलासपूर दरम्यान १६० किलोमिटर प्रति तास हायस्पीड ट्रेन धावणार आहे. बिलासपूर, रायपूर आणि नागपूर मंडळांतर्गत प्रस्तावित रेल्वे काॅिरडोरचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तसा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे.जलदगतीने रेल्वे प्रवास व्हावा आणि दोन राज्यातील अंतर तीन ते साडेतीन तासात पोहोचण्याकरिता रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते बिलासपूर पर्यंत ४२० किमी हायस्पीड रेल्वेचा ट्रॅकला मंजुरी दिली आहे. याकरिता ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. १६० किमी प्रतीतास ही गाडी धावणार आहे. या मार्गावरील टॅ्रक बदल व दुरुस्तीकरिता ९६४ कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये मंजूर झाले आहे. बिलासपूर झोनमधील प्रथम टप्प्यातील कामे सुरु करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. बिलासपूर, रायपूर, नागपूर असे हे मंडळ राहणार असून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य परिचालक प्रबंधकाचे यावर नियंत्रण राहणार आहे. नागपूर ते राजनांदगावपर्यंत रेल्वे ट्रॅक व्यवस्थित आहे. पंरतु उर्वरित रेल्वे मार्गावर जंगल, टेकड्या असल्याने कामे करणे सरळ नाहीत. २६२ किमीच्या भागात ७४ पुल येत असून लहानमोठे नागमोडी वळण आहेत. यामुळे सर्वाधिक खर्च याठिकाणी होणार आहे. काही ठिकाणी दुसरा ट्रॅक टाकावा लागणार आहे. त्यासाठी ५८४ कोटींचा खर्च येणार असून सिग्नल प्रणाली आधुनिकीकरण करुन क्षमता व वेग वाढविण्यात येणार आहे. या मार्गावर २.३८ मानवरहीत रेल्वे क्रॉसिंग आहेत. ते सर्व बंद करण्यात येतील. सध्या ६३ रेल्वे क्रॉसिंग बंद आहेत. टॅ्रकच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे तयार करण्यात येतील. या हायस्पीड ट्रेनमुळे नागपूर-बिलासपूर हे अंतर केवळ साडेतीन तासात पूर्ण होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.महाराष्ट्र व छत्तीसगड ही दोन राज्ये तथा पुढील ओरीसा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात कमी कालावधीत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. उत्तर भारतात जाण्याचा हा एकमेव मार्ग ठरु शकतो. यासंदर्भात उपविभागीय अभियंता हरीषकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आम्हाला काहीही सांगता येत नसून अधिक माहितीसाठी विभागीय उपअधिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी सांगितले.
नागपूर-बिलासपूर हायस्पीड ट्रेन धावणार
By admin | Published: November 21, 2015 12:23 AM