शहरात झाडांच्या खोडावर पोस्टर, फलक, रोषणाईच्या माळा असतात. झाडांच्या आधारे उभ्या राहणाऱ्या दुकानांच्या वायरी झाडांवर लटकलेल्या असतात. जाहिरातीसाठी झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावले जात आहे. परंतु झाडांनाही वेदना होतात याचा विचार कुणीच करत नाही.
डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी झाडांनादेखील संवेदना असतात हे स्पष्ट करून दाखविले आहे. नागरिकांची ही कृती झाडांना हानिकारक ठरत आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि राष्ट्रीय हरित लवाद यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे स्पष्टपणे अधोरेखित आहेत. तरी लोक बेजबाबदारपणे वागून झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावतात. खिळे कालांतराने गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो. परिणामी झाडांचे आयुष्य कमी होत जाते. यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.