लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले, आपण कर्जमुक्त होऊ असे वाटले. कर्जमाफीसाठी पात्र असताना अद्यापही लाभ मिळाला नाही. पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. आता आम्ही शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? सरकार प्रोत्साहन अनुदान देणार की कर्जमुक्ती करणार. आम्हाला वाऱ्यावर तर सोडणार नाही ना, असा उद्विग्न सवाल लाखांदूर तालुक्यातील घोडेझरी येथील शेतकरी विनोद मेंढे करत होते. त्यांच्यासारखीच इतर शेतकऱ्यांचीही अवस्था जिल्ह्यात आले. विनोद मेंढे यांच्याकडे घोडेझरी शिवारात दीड एकर शेती आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असताना लाभ मिळाला नाही. पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. तरीसुद्धा सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली. ऐन धान कापणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्यामुळे हातात आलेल्या पिकाचे नुकसान झाले. महाविकास आघाडीचे सरकार येताच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दाेन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यानंतर कोविडचे संकट आल्याने नंतर दिल्या जाईल, असे आश्वासन देण्यात आले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार अनुदान देण्याचे आश्वासन दिले. २० ऑक्टोबर रोजी प्रोत्साहनाची रक्कम अदा केली. मात्र, कर्जमुक्ती योजनेला पात्र असूनही आतापर्यंत लाभ मिळाला नाही. नवीन सरकार येताच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय काढला व पात्र शेतकऱ्यांची यादीही प्रसिद्ध केली. मात्र, यात विनोदचे कुठेच नाव नाही, अशीच अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे.
वाढता खर्च आणि हमीभाव कमी
- दिवसेंदिवस वाढणारी महागाई, शेतीसाठी लागणारा खताचा खर्च, इंधन वाढल्यामुळे ट्रॅक्टरच्या भाड्याचा खर्च, धानावर येणाऱ्या रोगांमुळे औषधीचा खर्च, वाढती शेतमजुरीचा खर्च तसेच इतर सर्व बाबींचा खर्च आणि पिकांवर येणारे अनेक नैसर्गिक संकट यामुळे उत्पादन कमी. एवढा खर्च असताना केंद्र सरकारकडून मिळणारा तुटपुंजा हमीभाव यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडू शकत नाही.
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले. मात्र, ना कर्जमाफी झाली नाही. प्रोत्साहन अनुदान यादीत नाव टाकून सरकारने किमान एकतरी लाभ घ्यावा. - विनोद मेंढे, शेतकरी, घोडेझरी