महेंद्र निंबार्ते विरूद्ध गुन्हा दाखल : कारवाईसाठी महिलेचे उपोषण सुरूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काँग्रेस कमिटीच्या क्रियान्वयन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका महिलेची चार लाख रूपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी साकोली पोलिसात निंबार्तेविरूद्ध गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाला प्रारंभ केला आहे.साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील झेंडा चौकातील रहिवाशी देवांगना चांदेवार यांना माजी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी जिल्हा परिषद शाळेत चित्रकला शिक्षक पदाची नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडून चार लाख रूपये घेतले होते. त्यानंतर देवांगना चांदेवार यांनी निंबार्ते यांना वेळोवेळी नोकरीबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून महेंद्र निंबार्तेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होऊनही निंबार्तेविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्या महेंद्र निंबार्तेसह याप्रकरणात कारवाईला विलंब करणाऱ्या साकोलीचे ठाणेदारांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी देवांगणा चांदेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
नोकरीच्या नावावर महिलेला चार लाखांनी गंडविले
By admin | Published: June 06, 2017 12:19 AM