कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही अटी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बार शाॅप, वाईन शाॅप सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत, तर परमिट रूम सकाळी ११.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली आहे. तसेच देशी दारूची दुकाने सकाळी ८ वाजता उघडून रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्याची वेळ आहे. मात्र 'लोकमत'च्या प्रतिनिधीने २१ जानेवारी रोजी रात्री शहरातील व शहराबाहेरील काही वाईन बारची पाहणी केली असता काहींनी वेळेवर, तर काहींनी बाहेरून दरवाजा बंद करून आतून दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. यामध्ये शहरातील खात रोडवरील बार, राष्ट्रीय महामार्गाच्या कडेवरील बार, वरठी रस्त्यावरील बार, शहरातील मध्यभागी असलेल्या बारचा समावेश आहे. दरवाजा बंद असल्यानंतरही चाैकीदाराला सांगून दरवाजा उघडून ग्राहकांना आत घेण्याची व्यवस्था काही ठिकाणी दिसून आली.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?
अबकारी अनुज्ञप्त्यांना ५० टक्के क्षमतेनुसार निर्धारित वेळेनुसार कोविड १९ संदर्भात वेळावेळी जाहीर केलेल्या अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून बार, वाईन शाॅप सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
एफएल ३ (परमिट सुरू) सकाळी ११.३० ते रात्री १०, वाईन शाॅप, बीअर शाॅप सकाळी १० ते रात्री १०, देशी दारू सकाळी ८ ते रात्री १० वाजतापर्यंत वेळ निर्धारित केली आहे.
बारची संख्या १६६
वाईन शाॅप ७
कोट
शासनादेशानुसार जिल्ह्यात मद्य विक्री होत आहे. शहरात किंवा शहराबाहेर कुठेही वेळेनंतर बार, वाईन शाॅप सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक पथकच कार्यरत आहे. तसेच कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी. यावरुन कारवाई कारवाई करण्यात येईल.
एस. व्ही. गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भंडारा
शहरात
शहरातील वाईन बार, बीअर बार वेळेत बंद होत असले तरी काहीजण वाईन शाॅपच्या समोर उभे राहून विक्री करीत असल्याचे दिसून आले. तर आतमध्ये असलेल्या काही वाईन शाॅपमध्ये खुलेआम विक्री सुरू होती. बीअर बार आणि वाईन बार आतून सुरू बाहेरून बंद असल्याचे वास्तव आहे.
शहराबाहेर
शहराबाहेर दारूविक्री व त्यांना बसण्याची व्यवस्था खुलेआम असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत दिसून आले. कोणाचेही निर्बंध त्यांच्यावर नसल्याचेच शहराबाहेरील वाईन बार, बीअर बार व वाईन शाॅपमधील स्थितीवरून स्पष्ट झाले. यावरून पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने शहराबाहेरील बार व शाॅप संचालकांना सूटच दिल्याचे चित्र आहे.