महिला संघर्ष समितीचा आक्षेप : डोंगरी बाजारटोला येथील प्रकारतुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरी (बु.) बाजारटोला येथे महिलांनी दारुबंदीकरिता एल्गार पुकारला होता. ९ आॅक्टोबर रोजी येथे दारुबंदीकरिता निवडणूक होत आहे. निवडणूक यादीत येथे १३ पुरुषांची नावे असून काही मृत महिलांची नावे आहेत. दि. २८ सप्टेंबर रोजी आक्षेप घेतल्यानंतरही यादी दुरुस्त करण्यात आली नाही. सोमवारी महिला संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.डोंगरी बु. (बाजारटोला) येथील महिला शक्ती व्यसनमुक्त दारुबंदी संघर्ष समितीने बाजारटोला येथील दारुविक्री दुकान बंद करण्याची मागणी शासनाकडे रितसर केली. त्या अनुषंगाने शासनाने दाखल घेऊन नियमानुसार येथे निवडणूक घेण्याचे निश्चित केले. त्याकरिता मतदार यादी तयार करणे, प्रकाशित करणे इत्यादी कार्यक्रम तयार केला.दि. २३ सप्टेंबर रोजी तुमसर येथील तहसील कार्यालयाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महिलांची मतदार यादी प्रकाशित केली. या यादीत गावातील १३ पुरुषांची व काही मृत महिलांची नावे समाविष्ट आहेत. या यादीवर दारुबंदी संघर्ष समितीने दि. २८ ला आक्षेप नोंदविला. आक्षेप नोंदविल्यावरही ही नावे जशीच्या तशीच ठेवण्यात आली. निवडणुकीकरिता चार बुथची गरज असताना केवळ दोनच बुथ येथे ठेवण्यात आले. दोन्ही बुथ बाजारटोला येथील शाळेत ठेवण्यात आले. येथे १७१३ मतदारांचा समावेश आहे. या संदर्भात सोमवारी सायंकाळी महिला शक्ती व्यसनमुक्त दारुबंदी संघर्ष समितीच्या अध्यक्षा मंगला पटले, सचिव अनिता लसुंते, सुनिता गौतम, श्रीकांत पटले, माजी उपसरपंच वसंत चौधरी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)डोंगरी बु. (बाजारटोला येथे दारुच्या व्यसनापायी अनेकांची घरे उद्धवस्त झाली. त्यामुळे दारुबंदी करण्याकरिता महिला पुढे सरसावल्या. प्रशासनाने झालेली चुक दुरुस्त करून नवीन मतदार यादी तयार करण्याची गरज आहे. - शुभांगी राहांगडालेमहिला व बालकल्याण सभापती, जि.प. भंडारामहिला मतदार यादीतील पुरुष मतदारांची नावे वगळण्यात येतील. मृत महिलांची नावे वगळण्यात येणार नाही. विधानसभा निवडणूक यादीत त्यांची नावे आहेत. ती वगळण्याचा आम्हाला अधिकार नाही. - डी.टी. सोनवाने, तहसीलदार, तुमसर
दारुबंदी महिला मतदार यादीत मृतांच्या नावांचा समावेश
By admin | Published: October 05, 2016 12:45 AM