ग्रामगीतेचा प्रसार हेच ध्येय : ६ फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मोहन भोयर तुमसर ‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या, देव म्हणजे, मज माणूस न दिसे, अजब तमाशा, हा असला, नम्र असे जो तो द्या मजला, सगळे लोक म्हणून जरी सर्वांकरिता प्रेम करा असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला होता. तोच वारसा परसवाडा (देव्हाडी) येथील नानाजी कांबळे महाराज मागील ४३ वर्षांपासून अविरतपणे चालवित आहेत.तुमसर-भंडारा महामार्गावरील खापा (तुमसर) गावापासून तीन कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र परसवाडा (देव्हाडा) गाव आहे. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहचविण्याचे कार्य ४३ वर्षापासून सुरू केले. आज नानाजी कांबळे महाराजांचे अनुयायी विदर्भातच नव्हे तर खान्देश, मराठवाडा, पुणे व मुंबईत आहेत.ग्रामगीतेचा प्रचार, प्रसार हेच एकमेव ध्येय नानाजी कांबळे महाराजांचे आहे. शिक्षण, संस्कृतीबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मौलीक विचार, स्वातंत्र्य लढ्याची माहिती, ब्रिटीश राजसत्ता उलथवून टाकण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे स्फुरण किर्तनातून युवकांना जागृत केले याची माहिती नानाजी महाराज अनुयायांना प्रवचनातून देतात.परसवाडा येथे नाना महाराजांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दोन एकर परिसरात तपोवन तयार केले आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्याकरिता अभियंते, डॉक्टर, वकील येतात. मधुर वाणी, ओजस्वी प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध होतात. दररर्षी परसवाडा येथे ६ फेब्रुवारीला नि:शुल्क सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या विवाह सोहळ्यात महाराजांच्या मुलांचेही लग्न होणार आहे. या सोहळ्याला आतापर्यंत केंद्रीयमंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतात. ३० ते ३५ हजार नागरिकांची राहण्याची, भोजनाची शिस्तबद्ध व्यवस्था महाराजांचे अनुयायी करतात. यावेळी सर्वांवर ड्रोण कॅमेऱ्याने नजर ठेवली जाते. श्री गुरुदेव धाम मानव कल्याण सेवा आश्रम श्रीक्षेत्र परसवाडा येथे ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात नि:शुल्क आरोग्य तपासणी, औषधी वितरण शिबिर राहणार आहे. मानव कल्याणाकरिता धार्मीक, सामाजिक, मनोरंजन, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजन नाना महाराज यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश गायधने, सचिव धनीराम मांढरे, राजेंद्र चौधरी, प्रल्हाद धुर्वे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
राष्ट्रसंतांचा वसा चालवितात नाना महाराज
By admin | Published: January 25, 2017 12:39 AM