भंडारा - भाजपाचे खासदार नाना पटोले शुक्रवारी (8 डिसेंबर) खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्षांकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. नाना पटोले यांनी २००८ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. पुढे 2014 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. मात्र अलीकडे ते स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करताना दिसत होते. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.
नाना पटोले यांची कारकीर्द
५ जून १९६३ रोजी जन्मलेले ५४ वर्षीय नाना पटोले हे २४ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात उडी घेऊन १९८७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढले. त्यानंतर १९९२ मध्ये सानगडी क्षेत्रातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९९४ मध्ये लाखांदूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढले. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून १९९९ व २००४ अशा दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या.
त्यानंतर काँग्रेस सरकारच्या शेतक-यांप्रती उदासीन धोरणांविरूद्ध नाना पटोले यांनी डिसेंबर २००८ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर मे २००९ मध्ये ते लोकसभा निवडणूक अपक्ष लढले. त्यावेळी त्यांनी अडीच लाखांवर मताधिक्य घेतले होते. त्यानंतर जुलै २००९ मध्ये भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. २००९ च्या साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवारीवर विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले. पुढे २०१४ मध्ये भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तत्त्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता.
मे २०१४ ते मे २०१७ मध्ये भाजपामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मे महिन्यातच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या-त्या राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत पटोलेंच्या शेतकरी व ओबीसी प्रश्नावर मोदींनी हाताने इशारा करीत पटोलेंना बसायला लावले होते, तेव्हापासून नाना पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.
त्यानंतर स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज असलेले नाना पटोले यांनी जुलै महिन्यात नागपुरात एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरूद्ध टीका करीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यांवरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर नोटाबंदी आणि जीएसटीवर पुणे येथे आयोजित माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासोबत केंद्राच्या धोरणावर टीका केली. त्यापूर्वी यवतमाळ, अमरावती, कोल्हापूर येथील कार्यक्रमात त्यांचा स्वपक्षावर हल्लाबोल सुरू होता. अलीकडेच डिसेंबर महिन्यात अकोल्यात शेतक-यांसाठी यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.