आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे : पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 03:46 PM2022-07-20T15:46:35+5:302022-07-20T16:05:31+5:30
पटोलेंना शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले याविषयी विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसल्याचे म्हटले.
भंडारा : काँग्रेसची लोकांच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही. त्यामुळे कोणाकडे काय चाललं आहे हे बघण्यापेक्षा आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही दिवसापासून विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. भंडारा जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका बसला असून नाना पटोलेंनी भंडाऱ्यात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांना शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले, याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याविषयी बोलणं टाळलं. आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यात सध्या पूरस्थिती आहे. भंडारा जिल्ह्यातही पूर परिस्थिती आली असून आमचे लक्ष सध्या पूर परिस्थितीकडे आहे, असे पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीचं तीन चाकावरचं सरकार समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोसळलं, असे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना पटोलेंनी अनिल बोंडे यांच्या बोलण्यात काही तारतम्य नाही, असे म्हणत जोरदार टोला हाणला. त्यांच्याविषयी काय बोलावे, आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, असे म्हणत पटोले यांनी बोंडे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले आहे.