लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील पूर्वीच्या बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाजनांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. या वाड्यात कुणालाही सहजतेने आपुलकी मिळते. पूर्वजांनी दिलेली सहिष्णुतेची शिदोरी जपण्याची जिद्द तलमले परिवारात आजही दिसून येते. गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडिलोपार्जित नंदी भजनाच्या साथीने फेरी घालतो. गावातील श्रद्धाळू या नंदीबैलाच्या सोहळ्याला हजेरी लावतात. काला मिळेपर्यंत व नंदीचे दर्शन होईपर्यंत श्रद्धाळूंना वाडा सुटत नाही. लाकडी रथावर त्याला सजवून गावात फेरी घातली जाते. समोर भजनी मंडळ व सोबत श्रद्धाळू भाविक मंडळी उपस्थित राहतात. चौकाचौकांत थांबवून प्रत्येकाला दर्शन दिले जाते. काल्याचा प्रसाद देऊन संपूर्ण गाव प्रदक्षिणा घातली जाते. नवदुर्गा महिला भजनी मंडळाच्या संगीतमय साथीने भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते. टाळ, मृदुंग, ढोलकी, हार्मोनियमच्या सोबतीने नंदीची गाव फेरी उत्साहात पार पडली.
बाॅक्स
दहा कुडव धान्यात खरेदी केला नंदी
शंभर वर्षांपूर्वी पालांदूर येथील बापू महाजन प्रसिद्ध होते. महाजनकीचा थाट पालांदूरच्या संस्कृतीचा अभिमान होता. त्याच कालावधीत गावातील सर्वांत मोठा नंदी त्यांनी लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथून दहा कुडव धान्य देऊन खरेदी केला होता. त्याचा रुबाब व देखणे रूप आजही सर्वांना भुरळ घालते.
कोट
आजोबांची अखंड परंपरा आजही सर्वांच्या सहकार्याने टिकून आहे. वाड्यातील लहान-मोठे सर्व सदस्य सहकार्य करीत असल्याने कार्य सिद्धीला जात आहे. गावकरीही सहभाग देत असल्याने आमचा उत्साह टिकून आहे.
देवराम तलमले
आयोजक पालांदूर