शिवनी ग्रामपंचायतचा पुढाकार : किशोरवयीन मुली व महिलांसाठी मदतीचा हाथप्रशांत देसाई भंडारालैंगिक शिक्षण सक्तीचे करण्याबाबत शासन विचाराधिन असले तरी अनेक महिलांना दर महिन्याला येणारे प्रश्न मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. मासिक पाळी या विषयावर बोलताना महिला संकोचतात. अगदी सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात लागली की, हातात रिमोट येतो आणि चॅनल बदललं जातं. मेडिकलमध्ये जाऊन नॅपकिन घेणे अनेक महिलांना अवघड होऊ जातं. अशी स्थिती ग्रामीण भागात तर ठळकपणे दिसून येते. लाखनी तालुक्यातील शिवनी येथील किशोरवयीन मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन घेतांना अडसर किंवा निर्माण होणारा न्युनगंड दूर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ लावली आहे. यामुळे गावातील महिला व किशोरवयीन युवतींना आता केवळ पाच रूपयात एक पॅड देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागातील महिलांची कुचंबणा थांबवण्यासाठी शिवनी ग्रामपंचायतीने घेतलेला हा पुढाकार खरोखरचं महिला व युवतींसाठी उपयुक्त ठरणारा आहे. अशी मशिन लावणारी शिवनी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.महिलांची ‘त्या’ पाच दिवसांमध्ये आरोग्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. त्या दिवसांमध्ये परंपरागत कापडासारख्या गोष्टी वापरल्याने याबाबत अनेकदा अस्वच्छता आणि अतिस्रावाचा प्रश्न उद््भवत होता. त्यामुळे त्या काळात सॅनिटरी नॅपकिन महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती, अज्ञान लाजऱ्या स्वभावामुळे अत्यल्प महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याचे दिसते.शिवनी ग्रामपंचायतने महिलांच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर पुढाकार घेत जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी केंद्रात ‘सॅनेटरी नॅपकिनची व्हेंडिंग मशीन’ लावली. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे समाजकारण्यांपासून सामान्य महिलांपर्यंत अनेकांनी कौतुक करून याला बळ दिले आहे. यावेळी सरपंच माया कुथे, ग्रामपंचायत सदस्य रेखा लांडगे, गीता शेंडे, शिला बावनकर, उषा नागलवाडे, देवांगणा शेंडे, शुध्दमता खांडेकर, डॉ. स्वाती कमाने यांच्यासह गावातील महिला व किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.महिला व युवतींची समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने ही व्हेंडिंग मशीन अंगणवाडी केंद्रात लावली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित विषय मार्गी लागल्याने समाधान वाटत आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा- माया कुथे, सरपंच, ग्रामपंचायत शिवनी.असे काम करेल मशीनएका मशीनमध्ये ५० पॅड ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन वा १-१ रूपयांचे शिक्के किंवा ५ रूपयाचा एक शिक्का टाकले तरी पॅड बाहेर येईल. मात्र मशिनमध्ये पाच रूपये गेल्यानंतरच पॅड बाहेर येईल. पाच रुपये टाकल्यानंतर मशिन एक पॅड बाहेर टाकेल.सुती कापडाचे असावे नॅपकिनजागतिकस्तरावर तयार होणारे नॅपकिनचे विघटन होत नसल्यामुळे ते पर्यावरणासाठी घातक ठरतात. त्यामुळे या नॅपकिनमध्ये सुती कापडाचा वापर करण्यात यावा. शिवनी ग्रामपंचायतीने देखील सुती कापडाचा वापर असणाऱ्या नॅपकिनच्या वापरावर भर दिलेला आहे.मशीन पाहण्यासाठी गर्दी ग्रामीण भागातील महिला, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. पाच रूपयाचा शिक्का टाकताच पॅड येतात. ही मशीन बसवण्यात आल्यानंतर त्याची गावभर चर्चा झाली. काहींनी उत्सुकतेपोटी हे मशीन पाहण्यासाठी गर्दी केली. लवकरच समाजाच्या सर्वस्तरांतील महिला या मशीनचा वापर सुरू करतील अशी अपेक्षा ग्रामपंचायतने व्यक्त केली आहे.
न्यूनगंड टाळण्यासाठी अंगणवाडी केंद्रात ‘नॅपकिन मशिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2017 12:43 AM