मधूमेहावर मार्गदर्शन : आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरजगोंदिया : धन्वंतरी दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आरोग्य विभाग व आयुष यांच्या मार्फत साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी. एल. पुलकुंडवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड उपस्थित होते.या वर्षापासून धन्वंतरी जयंती हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुर्वेदिक पध्दतीने मधूमेह हा कसा दूर करता येईल, याबद्दल आयुर्वेदाचार्य डॉ. मंगेश सोनवाने यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आहार-विहाराच्या माध्यमातून मधूमेहापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो. मधूमेह होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून मधुमेहापासून दूर राहू शकतो, यावर मार्गदर्शन केले. माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्याकरीता आयुर्वेदांतर्गत गर्भसंस्कार करून योग्य आहार-विहार घेवून सुदृढ संतती व सुदृढ माता निर्माण करता येईल असे एम.एम.आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. भैरवी निंबार्ते म्हणाल्या.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुकाअ यांनी कशाप्रकारे आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्रामध्ये उत्तम सेवा देवू शकतात. गुजरात पॅटर्नप्रमाणे प्रा.आ.केंद्रामध्ये जर आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी याची नियुक्ती केल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासणार नाही, भारतीय संस्कृतीचे पालन योग्य प्रकारे करणे हे आजच्या पिढीला आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनीही याप्रसंगी आयुर्वेद व भारतीय संस्कृतीनुसार आहार-विहार केल्यास नक्कीच आरोग्य प्राप्त केल्यास आपण अनेक आजारापासून दूर राहू असे या प्रसंगी सांगितले. संचालन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिना वट्टी, प्रस्तावना साथरोग अधिकारी डॉ.बी.आर.पटले यांनी केले. यावेळी डॉ. महेंद्र संग्रामे, डॉ. निलीमा कुथे, डॉ. शाईन खान, डॉ. मुकेश येरपुडे, डॉ. संगीता भोयर, डॉ. तुलशी भगत, डॉ. सुजाता मरापे, डॉ. रेणुका जेणेकर, डॉ. अमित खोडनकर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा उत्साहात
By admin | Published: November 07, 2016 12:48 AM