कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की : मजूर होणार बेरोजगार
तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या देव्हाडी शिवारात सुरू आहे. येथील एमआयडीसीत जाणारा रस्ता या बांधकामामुळे बंद पडला आहे. त्यामुळे कारखान्यात मालवाहतूक वाहने बंद झाले. नियोजन अभावी कारखाने बंद करण्याची वेळ येथे आली आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस कारखाने बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून हा महामार्ग देव्हाडी एमआयडीसी समोरून जातो. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच एमआयडीसी आहे. सुमारे शंभर ते दीडशे अंतर रस्त्याचे बांधकाम मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. एमआयडीसीला जाणारा रस्ता यामुळे बंद करण्यात आला आहे. एमआयडीसीतील कारखान्यात दररोज मालाची ने आण करण्याकरिता ट्रक येतात रस्ता बंद पडल्यामुळे मालवाहतूक ट्रकला जाण्यास दुसरा पर्याय रस्ता नाही. किमान एका बाजूने रस्त्याचे बांधकाम सुरू ठेवून एमआयडीसीला जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी रस्ता येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खुला ठेवण्याची गरज होती. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नियोजनाच्या अभावामुळे एमआयडीसीतील कारखाने बंद करण्याची वेळ येथे आली आहे. त्यामुळे येथील मजुरांना किमान आठ ते दहा दिवस बेरोजगार व्हावे लागणार आहे.
यासंदर्भात एमआयडीसीतील कारखानदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कारखानदारांवर कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे.
स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन एमआयडीसी मधील जाणारा रस्ता येथे मोकळा करण्याची मागणी येथील कारखानदार कमलेश उगले यांनी केली आहे. महामार्ग बांधकाम करताना स्थानिक परिस्थितीचा विचार येथे करून किमान एमआयडीसीतील रस्ता तत्काळ खुला करावा अशी मागणीही कारखानदार कमलेश उची बगले यांनी केली आहे.