- गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : मुंबई-कोलकता या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावर गुरूवारी रात्री झालेल्या अपघाताच्या १८ तासानंतरही हा राष्ट्रीय महामार्ग जाम आहे. परिणामत: नागपूर-भंडारा-लाखनी या दरम्यान वाहतूक खोळंबली असून रात्रभरापासून महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम आहेत.
गुरूवारी रात्री पाऊणेआठ वाजताच्या दरम्यान, डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता. ऐन पुलावर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आग विझविल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र दुतर्फा अडलेल्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे रात्रीपासून वाहतुकीची समस्या कायमच आहे. परिणामत: हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडल्यासारखी स्थिती मागील १८ तासांपासून आहे. या महामार्गचे काम सुरू असल्याने अरूंद पुलावरील मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुहेरी वाहतुकीचा मार्ग नसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजतासुद्धा हीच परिस्थिती कायम होती. अनेक वाहने अडलेली होती. असा झाला होता अपघात
भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावरील भिलेवाडा ते पलाडी दरम्यान एआर पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी रात्री ७:४५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती. या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडी दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील पुलावरून ही दोन्ही वाहने समोरासमोरून येताना टँकरला कंटेनरची मागून घडक बसली. यामुळे टँकर फुटून डिझेल बाहेर आले आणि दोन्ही वाहनांना आग लागली. यात कंटेनरमधील एकाचा आत फसून जळून मृत्यू झाला होता. तब्बल दोन तासांनंतर दोन अग्नीशामक वाहनांच्या माध्यमातून ही आग विझविण्यात यश आले होते.