गोंदिया : उत्तम आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून, अशा विविध खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक श्रुती डोंगरे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, नेहरु युवा केंद्र व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्तवतीने रविवारी (दि. २९) स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी क्रीडा अधिकारी ए. बी. मरसकोल्हे होते. यावेळी तालुका क्रीडा संयोजक विकास कापसे, चेतन मानकर, विशाल ठाकुर, क्रिष्णा बहेकार, धनंजय भारसाकळे, माधुरी वानकर प्रामुख्याने उपस्थिते होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ऑलिम्पिक स्वर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बळकट शरीरात बळकट मन असते. खेळाच्या माध्यमातून आरोग्य निरोगी राहाते. त्यामुळे जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्व आहे. खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे मत डोंगरे यांनी व्यक्त केले. भारतीय क्रीडा संस्कृतीचे जतन करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत मरसकोल्हे यांनी व्यक्त केले.
स्व. मेजर ध्यानचंद यांच्यापासून उदयोन्मुख खेळाडूंनी प्रेरणा घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत खेळाची जागरूकता निर्माण करावी, असे यावेळी सांगितले.
संचालन करून भारसाकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिवचरण चौधरी, विनेश फुंडे, रवी परिहार, जयश्री भांडारकर यांनी सहकार्य केले.