मोहाडी : रस्ता बनविताना बांधकाम विभागाने चुकीचे नियोजन केल्यामुळे गुरुकुल विद्यालय परिसरात पावसाचे संपूर्ण पाणी साचत असल्याने विद्यालयाला तलावाचे स्वरूप आले आहे. विद्यालयात जाण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी निचऱ्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी विद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोहाडी ते रोहा हा राज्यमार्ग नुकताच तयार करण्यात आला. परंतु, पावसाचे पाणी व शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या तयार करण्यात आल्या नाहीत. उलट गरज नसताना मोरीचे बांधकाम केल्यामुळे रस्त्यावरील व शेतातील पाणी मोरीच्या मार्गाने गुरुकुल विद्यालयाच्या आजूबाजूला जमा होत आहे. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शाळेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली चूक दुरुस्त करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी जाण्याकरिता कच्च्या किंवा पक्क्या नाल्या तयार करण्यात याव्यात, गुरुकुल शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरील तोडलेला लहान पूल पुन्हा बांधण्यात यावा, जेणेकरून रस्त्यावरून वाहणारे पाणी नालीने गेल्याने रस्ता खराब होणार नाही व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यास त्रास होणार नाही. हे प्रकरण त्वरित मार्गी लावण्याची मागणी शाळा प्रशासनातर्फे बांधकाम विभागासह खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके यांच्याकडे केली आहे.