भंडारा : येथील जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी असलेल्या एका नक्षलवाद्याचा नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी तब्बल २४ दिवसानंतर भंडारा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
रमेश उर्फ हिडमा कोसा मडावी (४७, रा. विरपुरम, ता. कोझ, जि. सुकमा, छत्तीसगढ) असे मृत नक्षलवाद्याचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत त्याच्यावर भादंवि ३०६, १४७, १४८, १४९, ३४१, १२० (ब)सह भारतीय हत्यार कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आदी गुन्हे दाखल होते. तो भंडारा कारागृहात कैद होता. १५ नोव्हेंबर रोजी त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्याला उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील आयसीयू वाॅर्ड क्रमांक ५२ मध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूची कागदपत्रे अजनी पोलिस ठाण्यातून भंडारा पोलिस ठाण्यात आणून हवालदार केशव बेद्रे याने पेश केली. त्यावरून १२ डिसेंबर रोजी सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार इर्शाद खान करीत आहेत.