लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेत जाचक अटीमुळे अनेकांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. जाचक अटी रद्द करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँगेस शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीच्या वतीने घरकूलकरिता मोर्चा काढला होता. राज्य शासनाने त्याची दखल घेत घरकुलसंबंधित मागणी मान्य केली. परंतु घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक जाचक व त्रासदायक अटींची पूर्तता करावी लागत आहे. अनेकजण जाचक अटींची पूर्तता करू न शकल्यामुळे आजही अनेक लोकांना योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.निवेदनावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांना निधी लाभार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा, इंदिरा नगर व संजय नगर लाखनी येथील पट्टेधारकांना पट्टे मंजूर करून प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, रमाई आवास योजनेप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतही सातबारा व आखीव पत्रिकेची अट रद्द करून ‘गाव नमुना आठ’ ला मालकीचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, रमाई आवास योजनेप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर रक्कम सरसकट देण्यात यावी, रमाई आवास योजनेतील अर्जदाराच्या जात प्रमाणपत्राची अट शिथिल करून कुटुंबातील सदस्याचे जात प्रमाणपत्राच्या आधारावर लाभ देण्यात यावा आदी मागण्याचा समावेश आहे. मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात शहर अध्यक्ष धनू व्यास, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने नरेश इलमकर, नागेश पाटील वाघाये, शशिकांत भोयर, मनोज पोहरकर, नितीन निर्वाण, रामकिशोर गिहेपूंजे, आयशा बेगम शेख, अर्चना ढेंगे, विजय चाचेरे, शुभम रहांगडाले, सचिन निर्वाण, अजय पुडके, सुरज भांडारकर, राकेश उके उपस्थित होते.
आवास योजनांतील जाचक अटी रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM