रंजीत चिंचखेडे
चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयाचे पाणी डावा कालव्यांतर्गत उन्हाळी धान लागवडीसाठी विसर्ग करण्यात येत असले, तरी करारनामा व डिमांड भरण्यासाठी शेतकरी सरसावले नाहीत. यात शेतकऱ्यांची उदासीनता दिसून येत असल्याने कर्मचाऱ्याची झोपच उडाली आहे. निर्धारित सिंचित हेक्टरनुसार ४७ लाख रुपयांची वसुली असताना, फक्त ८ लाख रुपये वसूल झाले आहेत. तिसऱ्या चरणात पाणीवाटप सुरू झाले आहे, परंतु वसुली मात्र खोळंबली असल्याने पाटबंधारे विभागाचे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी डावा कालव्यांतर्गत गावांच्या शेतशिवारात सिंचनाकरिता वाटप करण्यात येत आहे. उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी ३ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणली जाणार आहे. यात शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली असून, डिमांडधारक राशी ४७ लाख रुपयांचे घरात आहे. यात चांदपूर, टेमनी, मोहाडी खापा, गोंदेखारी, वरपिंडकेपार, महालगाव, ब्राह्मणटोला, देवसरा, बपेरा, बिनाखी, चुल्हाड, गोंडीटोला, सुकळी नकुल, देवरी देव, वाहनी गावांचा समावेश करण्यात आला आहे. उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी चांदपूर जलाशयाचे पाणीवाटप प्रक्रिया पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. तिसऱ्या चरणातील पाण्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आधी धान पिकांचे नर्सरी लागवडीसाठी पाणी देण्यात आले. शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणीची तयारी सुरू केली आहे, परंतु शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी पुढाकार घेत असताना करारनामा केला नाही, याशिवाय डिमांड राशी पाटबंधारे विभागात जमा केले नसल्याने कर्मचाऱ्याची दमछाक सुरू झाली आहे. नियोजित हेक्टर आर क्षेत्रनुसार ४७ लाख रुपयांची वसुली अपेक्षित आहे. या वसुलीकरिता कर्मचारी गावे गाठून शेतकरी यांच्यासोबत संवाद साधत आहेत. गावात बैठकाचे सत्र राबवित आहेत. करारनामा व डिमांड राशी अदा करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, परंतु शेतकऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचा बाका अनुभव कर्मचाऱ्यांना आलेला आहे. एकाच गावात अनेक वेळा धाव घेण्याची पाळी कर्मचाऱ्यावर आली आहे. तीन आठवड्यांनंतर फक्त ८ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
३९ लाख रुपयांची वसुली शिल्लक असल्याने पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धावाधाव करीत आहेत. पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. जेमतेम ६ कर्मचारी कार्यरत आहेत. शाखा अभियंता यांचा अपवाद वगळला, तर पाणसारा वसुलीकरिता मनुष्यबळ नाही. यामुळे थकबाकीचा आकडा फुगतच आहे. सन १९७६ पासून अनेक शेतकऱ्यांनी पाणसारा वसुली दिली नाही. यामुळे खरीप व उन्हाळी धान लागवडीचा दीड कोटी रुपयांचा पाणसारा थकबाकी आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण पाटबंधारे विभागाला झाले आहे. या प्रकल्प स्थळात अनेक मेंटनन्सची कामे आहेत. निधीअभावी प्रकल्पात उतरती कळा येणार असल्याने, पाणसारा देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेण्याची गरज आहे. सिंचनासाठी पाण्याची बोंबाबोंब शेतकरी ठोकत असले, तरी पाणसारा वसुली देण्यासाठी मात्र उदासीनता दाखविण्यात येत असल्याने, लोकप्रतिनिधी चांगलेच संतापले आहेत.
कोट बॉक्स
“डावा कालव्यांतर्गत समावेश गावातील शेतीला उन्हाळी धान पिकांचे लागवडीसाठी चांदपूर जलाशयाचे पाण्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे, परंतु नियोजितनुसार शेतकऱ्यांनी करारनामा व डिमांड राशी जमा केले नाही. यामुळे उद्दिष्ट गाठताना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी सहकार्याची अपेक्षा आहे. गावातील बैठकीत शेतकरी डिमांड राशी जमा करू शकतात, त्यांना सोईचे ठरणार आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना डिमांड राशी जमा करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. नंतर पाणीवाटप सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
गंगाधर हटवार, शाखा अभियंता सिहोरा