भंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दसाठी पाच हजार कोटींची गरज असताना राज्य शासनाने फक्त एक हजार कोटींची तरतूद करून प्रकल्पग्रस्तांसह सर्वांचीच निराशा केली आहे. राज्य शासन विद्युत पुरवठा खंडित करण्यावरही भर देत असून, या गंभीर विषयावरही शासन सहजपणे निर्णय घेत असल्याचा आरोप खासदार सुनील मेंढे यांनी केला. रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
खासदार मेंढे म्हणाले, राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र, या अर्थसंकल्पातून सर्वांचाच भ्रमनिरास झाला. आधी वीज जोडणी खंडित करणार नाही, या आदेशाला आठवडाभरातच तिलांजली देण्यात आली. कोरोना काळात वैतागलेल्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का आहे. आधीच जिल्हाभरात ३ हजार ८०० ग्राहकांची वीज जोडणी कापली असून, याचा आम्ही निषेध करीत आहोत.
कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर न जाता प्रशासनाने वेळीच खंबीर उपाययोजना करण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात शासनाने दाखविलेला ढीम्मपणा आता अडचणीचा ठरत आहे.
लसीकरणासाठी समोर या
जिल्ह्यात ५३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आतापर्यंत ३३ हजारपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, आजही अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत संभ्रम आहे. नागरिकांनी कुठलाही संभ्रम न ठेवता लसीकरणासाठी समोर यावे, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी पत्रपरिषदेत केले.