भंडारा : डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची संकल्पना मनुष्य जातीला दिली. त्यांचे विचार आणि कार्य समाजात रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाकडून सामाजिक व्यवस्थेचा विचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी केले.अकरावे आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्यावतीने आयोजित सम्यक संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.रणजित मेश्राम होते. अतिथी म्हणून भदंत सदानंद महाथेरा, आंबेडकरी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, प्रा.सतेश्वर मोरे, उपजिल्हाधिकारी जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपस्थित होते. यावेळी डॉ.कळसे म्हणाले, भारतीय राज्यघटनेशिवाय उत्तम साहित्य कुठेही नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक घटकाचा सांगोपांग विचार करुन घटना लिहीली आहे. या राज्य घटनेमुळेच आज महिलांना सर्वतोपरी अधिकार मिळाले आहेत. मानवी आयुष्य जगताना संविधानाची प्रस्तावना प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. यावेळी डॉ.कळसे व प्रा.रणजित मेश्राम यांच्या हस्ते ‘सम्मादिट्टी’ या संमेलन स्मरणिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त भदंत सदानंद महाथेरा यांचा चिवर, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र सत्कार करण्यात आला. यासोबतच आंबेडकरी साहित्य संमेलनात हिरीरीने सहभाग घेतलेले डॉ.मधुकर रंगारी, डॉ.संजय वाने,आसित बागडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भदंत सदानंद महाथेरा म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांवर मी जगत आहे. माझ्या भिक्षु जीवनाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाबासाहेबांचे विचार अमर्याद आहे. त्यांनी आपल्या देशाला दिलेले संविधानापेक्षा दुसरा राष्ट्रीय ग्रंथ नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण करा आणि त्याचे पालनही करा, असे आवाहन केले.प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक अमृत बन्सोड यांनी केले. कार्यक्रमासाठी महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, डी. एफ. कोचे, प्रा.अनिल नितनवरे, डॉ.मधुकर धारगावे, प्रा. अनमोल देशपांडे, महादेव मेश्राम, रुपचंद रामटेके, प्रभाकर भोयर, एम.डब्ल्यू दीहवले, सुमंत रहाटे, सी.एम.बागडे, करण रामटेके, आदीनाथ नागदेवे, वामन मेश्राम, गुलशन गजभिये, आसित बागडे, गौतम कावळे, के.एल.देशपांडे, संजय बन्सोड, मनिष वासनिक, प्रविण कांबळे, अरुण अंबांदे, माणिक रामटेके, यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)
सामाजिक न्यायाची संकल्पना रुजविणाऱ्या साहित्याची गरज
By admin | Published: December 21, 2014 10:53 PM