लोकमत जलमित्र अभियान : लोकसहभागातून सांगणार पाणी बचतीचे महत्त्वभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली. मोठ्या आणि मध्यम जलाशयांमधील पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आला आहे. अशीच स्थिती राज्याच्या बहुतांश भागात आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना कळावे आणि त्यातून पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी ‘लोकमत’ने राज्यभरात ‘लोकमत जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. यात पाणी बचतीसाठी उपक्रम राबविले जाणार असून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था, प्रतिष्ठाने, वसाहतींना प्रसिद्धी देऊन त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर मांडण्यात येणाार आहे. ‘जल-सेल्फी’ला मिळणार प्रसिद्धी‘‘लोकमत’च्या या उपक्रमांतर्गत पाणी बचतीचे छोटे-मोठे प्रयोग करणाऱ्यांनी आपण केलेल्या प्रयोगासह किंवा पाणी बचतीसाठी राबविलेले कोणतेही उपक्रम दिसतील अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून ‘सेल्फी’ (स्वत:चे छायाचित्र) काढून ते ‘लोकमत’कडे पाठवायचे आहे. योग्य सेल्फींना ‘लोकमत’मधून प्रसिद्धी दिली जाईल. आपले सेल्फी (९४२२९०८६११) या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपने पाठवू शकता. सोबत आपले नाव, गावाचे नाव आणि पाणी बचतीसाठी केलेल्या कामाची थोडक्यात माहितीसुद्धा पाठवावी. थेंब थेंब वाचवू या...राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. हा भंडारा जिल्ह्यातील छुपा दुष्काळच म्हणावा लागेल. शासन व प्रशासन या दुष्काळाचे निसर्गाच्या डोक्यावर खापर फोडत आहे. मात्र जलतज्ज्ञांच्या मते, हा निसर्गाचा नव्हे, तर मानवनिर्मित प्रकोप आहे. त्यामुळे आजचे जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त होऊच शकत नाही, येथे दरवर्षी मुबलक पाऊस होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही. ते सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. दुसरीकडे दिवसेंदिवस लोकसंख्या व शहरीकरण वाढत आहे. दैनंदिन सवयी बदलाव्या लागतीलपाणीबचतीसाठी प्रत्येक घरातील दैनंदिन सवयी बदलाव्या लागणार आहेत, शिवाय मुलांवर जलसंस्कार करावे लागतील. आजपर्यंत पाणीबचतीकडे कधी गांभीर्याने लक्षच दिले नाही, त्यामुळे ही वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्ती रोज कळत-नकळत पाण्याची नासाडी करतो. शिवाय दुसरीकडे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे जमिनीच्या पोटातील पाणीसुद्धा संपत चालले आहे. विहिरी व बोअरवेल कोरडे पडत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आमच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरत असून, त्यांना बदलण्याची गरज असल्याचे चर्चेतून समोर आले.पाण्याचा काटकसरीने वापर कराआम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. आज पाणी आहे म्हणून त्याची नासाडी सुरू आहे. मराठवाड्यात पाण्याची जी टंचाई आहे ती उद्भवू नये यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस कधीच कमी पडलेला नाही. चक्र बदलल्यामुळे वेळापत्रकात गडबड झाली आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि संपूर्ण महिना कोरडा जातो. त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेले जलमित्र अभियान स्वागतार्ह असून भंडारा नगरपालिका यात सहभागी होईल. -बाबूराव बागडे, नगराध्यक्ष, भंडारा.
पाणी बचतीसाठी लोकसहभागाची गरज
By admin | Published: May 25, 2016 1:20 AM